‘त्यांचा’ स्वबळाग्रह टिकला, तर सेना-राष्ट्रवादी एकत्र; जयंत पाटील यांनी काँग्रेसला लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 08:54 AM2021-06-25T08:54:05+5:302021-06-25T08:54:39+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील परिवार संवाद यात्रेची सुरुवात गुरुवारी तुळजाभवानीच्या द्वारातून करण्यात आली.
उस्मानाबाद : आम्ही तिन्ही पक्ष एकत्रच राहू. जर त्यांचा आग्रहच असेल स्वबळावर लढण्याचा आणि तो ‘शेवटपर्यंत’ टिकला तर किमान राष्ट्रवादी व शिवसेना तरी एकत्रच लढेल, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी काँग्रेसला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील परिवार संवाद यात्रेची सुरुवात गुरुवारी तुळजाभवानीच्या द्वारातून करण्यात आली. पाटील म्हणाले, लॉकडाऊन काळात अडचणीत आलेल्या घटकांना उमेद मिळू दे, पाऊस चांगला होऊ दे, असे साकडे तुळजाभवानी देवीला घालून मराठवाड्यातील परिवार संवाद यात्रेची सुरुवात केली आहे. ही यात्रा म्हणजे स्वबळाची चाचपणी नव्हे तर पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष समजूतदार आहेत. आम्ही एकत्रच राहू. काँग्रेसही आमच्यासोबतच राहील, अशी मला खात्री वाटते.
राज्यात अनेक ठिकाणी अनेक कार्यकर्ते, नेते राष्ट्रवादीत प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, कोरोनामुळे हे प्रवेश थांबले आहेत. जाहीर कार्यक्रम घेता येत नसल्याने कोरोना गेल्यानंतरच प्रवेश सुरू होतील. आमचे प्राधान्य बेरजेचे राजकारण करण्याचे असले तरी जे पक्ष सोडून गेले होते त्यांच्याबाबतीत स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.