उस्मानाबाद जिल्ह्यात ८५ गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 07:32 PM2019-01-01T19:32:35+5:302019-01-01T19:34:30+5:30
पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडे पडल्याने टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत़
उस्मानाबाद : दिवसेंदिवस दुष्काळी झळा तीव्र होत असून, पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़ जिल्ह्यातील ८५ गावांमध्ये निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत़ यातील ८ गावांना टँकरद्वारे तर ७७ गावांची तहान भागविण्यासाठी १२३ कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़
यंदा वेळेवर पडलेला पाऊस नंतर गायब झाला़ मध्यंतरीच्या कालावधीत कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली़ परतीचा पाऊस पडलाच नाही़ परिणामी जिल्ह्यातील २२३ प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही़ सद्यस्थितीत ५० हून अधिक प्रकल्प कोरडे पडले असून, शंभरावर प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ साधारणत: ९ टक्के उपयुक्त पाणीसाठा जिल्ह्यात आहे़ परिणामी गावा-गावाला पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडे पडल्याने टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत़
विशेषत: गावा-गावातील हातपंप, कुपनलिकाही उचक्या मारू लागल्या आहेत़ घागरभर पाण्यासाठी महिला, नागरिकांना भटकंती करावी लागत आहे़ जिल्ह्यातील शेकडो गावे टंचाईने त्रस्त झाली आहेत़ तालुकास्तरावरील प्रशासनाकडे शेकडो अधिग्रहण, टँकरचे प्रस्ताव धडकले आहेत़ निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने १३१ कुपनलिकांचे अधिग्रहण केले आहे़ यात आठ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, टँकर भरण्यासाठी आठ कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ तर ७७ गावांची तहान भागविण्यासाठी १२३ कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़
यात उस्मानाबाद तालुक्यातील चार गावात टँकर सुरू असून, ३९ गावांसाठी ७३ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तुळजापूर तालुक्यातील चार गावांसाठी चार अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ लोहारा तालुक्यातील दोन गावांची तहान भागविण्यासाठी दोन अधिग्रहणे करण्यात आली आहेत़
कळंब तालुक्यातील १८ गावांसाठी १८ अधिग्रहणे, भूम तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर तर दोन गावांसाठी कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ वाशी तालुक्यातील एका गावासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे़ तर परंडा तालुक्यातील दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, ११ गावांसाठी ११ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़
उस्मानाबादला अधिक झळा....
सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा उस्मानाबाद तालुक्याला बसत आहेत़ उस्मानाबाद तालुक्यासाठी एकूण ७७ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ यात चार गावांसाठी टँकर सुरू असून, टँकरसाठी चार अधिग्रहणे आहेत़ तर ३९ गावांसाठी ७३ कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़
या गावांना टँकरचा आधार....
उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव (बावी), रुई ढोकी, नांदुर्गा, भूम तालुक्यातील वालवड व गिरवली गावांना तर परांडा तालुक्यातील कात्राबाद, कंडारी या जिल्ह्यातील आठ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़