लाॅकडाऊन काळातही बाहेर फिरण्याचा मोह आवरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:33 AM2021-05-12T04:33:14+5:302021-05-12T04:33:14+5:30
भूम : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यातच ८ ते १३ मे या ...
भूम : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यातच ८ ते १३ मे या कालावधीत जनता कर्फ्यू लागू केला आहे. यास भूम तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असला तरी काही नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
तालुक्यात सध्या कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे मेडिकल, दवाखाने वगळता सर्वच आस्थापना बंद आहेत. शिवाय, बाजारपेठेत लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे ‘ब्रेक द चैन’साठी याचा फायदा नक्कीच होईल; परंतु प्रशासनास न जुमानता शहरातील अनेक नागरिक सकाळी काही तास व सायंकाळी काही तास मोकार फिरताना दिसून येत आहेत. सध्या तालुक्यात २ हजार ८७९ कोरोनाबाधित रुग्ण असून, २ हजार २३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात होम क्वारंटाइन २११ रुग्ण आहेत. गतवर्षी रुग्णसंख्या कमी असतानाही लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला होता; परंतु यंदा गतवर्षीच्या तुलनेत लॉकडाऊनला प्रतिसाद कमी झाल्याने दिवसाला ७० ते ८० ने बाधितांची संख्या वाढत आहे.
सध्या दैनंदिन ३५ टक्के रुग्ण सापडत आहेत.
कोरोनाबाधितांची साखळी ताेडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ८ मे १३ मे या कालावधीत पुकारलेल्या कडक लॉकडाऊनला भूमकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत भूम तालुक्याची परिस्थिती चांगली असली तरी तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी कडक लॉकडाऊन करून ‘ब्रेक द चैन’ करणे हाच पर्याय उपयुक्त ठरणार आहे.