तरूणांनी जीवाची बाजी लावून पकडलेला चोरटा पाेलिसांना धक्का देऊन पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 01:30 PM2021-12-18T13:30:42+5:302021-12-18T13:30:57+5:30
ट्रान्सफार्मरवरून वीजपुरवठा खंडित करून चाेरीच्या तयारीत हाेते चाेरटे
- बाळासाहेब स्वामी
ईट (जि. उस्मानाबाद) -ट्रान्सफार्मरवरून वीजपुरवठा खंडित करून चाेरीच्या तयारीत असलेल्या चाैघा चाैरट्यांचा तरूणांनी पाठलाग करून एकास पकडून पाेलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, पाेलिसांच्या हातावर तुरी देत चाेरटा पसार झाला. चाेरट्याने केलेल्या दगडफेकीत दाेन युवक जखमी झाले आहेत. ही थरारक घटना भूम तालुक्यातील ईट येथे शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर घडली.
भूम तालुक्यातील ईट-वाडवणा रस्त्यावरील जिजाऊ नगर परिसरात दाेन दुचाकीवर चार ते पाच चाेरटे थांबल्याची माहिती बस्थानक चाैकातील काही तरूणांना लागली. त्यामुळे धनगर गल्ली, वाडवणा रस्ता, गाढवे वस्ती भागातील मंगेश हुंबे, दत्ता असलकर, रोशन भोसले, परशु हुंबे , गणेश कोकाटे, मदन लोखंडे, रोहन थोरात यवुकांनी एकत्र येत त्या दिशेने निघाले. ताेवर चाेरट्यांनी भाेकर डीपीवरून वीजपुरवठा खंडित केला. अंधारात फायदा घेऊन चाेरटे चाेरीच्या तयारीत असतानाच काही तरूण डीपीजवळ दाखल झाले असता युवकांना पाहून चाेरटे दुचाकीवरून पळून जावू लागले. यानंतर तरूणांनीही त्यांचा पाठलाग सुरू केला. तरूण जवळ आल्याचे पाहून दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एका चाेरट्याने वाघावकर यांच्या किरणा दुकानासमाेर खाली उडी टाकून जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात घुसला.
मात्र, युवकांनी पाठलाग सुरूच ठेला. पुढे जाण्यासाठी रस्ता नसल्याचे लक्षात आल्यानंतर चाेरट्याने तरूणांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. यात महेश हुंबे जखमी झाले. मात्र, तरूण मागे हटले नाहीत. जिवाची फिकीर न करता चाेरटा पकडला असता, त्याने दत्ता आसलकर यांच्या बाेटाला चावा घेतला. यानंतर तरूणांनी संबंधित चाेरट्यास बस्थानक चाैकात आणून पाेकाॅ अशाेक करवर व शिपाई सादिक काझी यांच्या ताब्यात दिले. पाेलिस त्यास ईट औटपाेस्टच्या कार्यालयात नेत असताना चाेरट्याने ‘‘मी दुचाकीवरून पडलाे आहे. मला इजा झाली आहे. त्यामुळे दवाखान्यात घेऊन चाला’’, अशी विनंती केली. त्यावर पाेलीस त्यास प्राथमिक आराेग्य केंद्रात घेऊन गेले असता, दारातच त्याने पाेलिसांना धक्का देऊन अंधाराचा फायदा घेत पसार झाला. तरूणांनी जिवाशी खेळून पकडलेला चाेरटा पाेलिसांच्या हातून पसार झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.
अडीच तासाने पाेलीस व्हॅन दाखल...
ईट गावात तरूणांनी चाेरटा पकडल्याची माहिती वाशी पाेलीस ठाण्यास देण्यात आली. अशावेळी चाेरट्यास घेऊन जाण्यासाठी तातडीने पाेलीस व्हॅन घटनास्थळी दाखल हाेणे अपेक्षित हाेते. परंतु, माहिती दिल्यापासून तब्बल अडीच तासाने व्हॅन गावात पाेहाेचली. ताेवर चाेरटा पाेलिसांना धक्का देऊन पसार झाला. परिणामी वाशी ठाण्याच्या कर्मचार्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.