'शिव - शाहूंचे विचार, हाच राष्ट्राचा विकास'; छत्रपती संभाजीराजेंकडून स्वराज्य संघटनेची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 06:06 PM2022-08-10T18:06:25+5:302022-08-10T18:06:49+5:30
तुळजापुरातून मुहूर्तमेढ : लोगो, ध्वज, बोधवाक्याचे अनावरण, पहिली शाखा
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : छत्रपती संभाजीराजे यांच्या बहुचर्चित संघटनेची मुहूर्तमेढ क्रांतिदिनाचे औचित्य साधून तुळजापुरातून रोवण्यात आली. या संघटनेचे नाव स्वराज्य असे असून, ती शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केले. सोबतच लोगो, ध्वज व बोधवाक्याचे अनावरणही त्यांनी याप्रसंगी केले.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी छत्रपती संभाजीराजे यांनी स्वतंत्र संघटना उभी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार मंगळवारी क्रांतिदिनाचे औचित्य साधत राजेंनी तुळजापुरातून स्वराज्य या संघटनेची घोषणा केली. प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांना लढण्यासाठी व सामान्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी ही संघटना लढणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तुळजाभवानी देवीच्या महाद्वारात आयोजित कार्यक्रमातून त्यांनी संघटनेच्या स्थापनेमागचा हेतू विषद केला. मागच्या सात वर्षात राज्यात विविध पक्षांची सरकारे आली. मात्र, सामान्यांचे प्रश्न आहे तसेच राहिले. मराठवाडा उपेक्षित राहिला. या अन्यायाच्या विरोधात आपल्या संघटनेचा लढा राहणार आहे. पुढील एक वर्ष आपण राज्यभर फिरणार असून, त्यातून संघटन मजबूत करण्यात येईल, असेही छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. यावेळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संघटनेचा ध्वज व लोगोचे अनावरण 'जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, संभाजी राजे आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देत करण्यात आले.
ही आहे पंचसूत्री...
स्वराज्य संघटनेची वाटचाल ही पंचसूत्रीवर आधारित राहणार आहे. यासाठी शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण व आरोग्य हे पाच विषय निवडण्यात आले आहेत. सोबतच गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठीही संघटना कार्यरत असेल, असे छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केले.
बोधवाक्य अन् पहिली शाखा...
संघटनेसाठी बोधवाक्यही तयार करण्यात आले आहे. शिव - शाहूंचे विचार, हाच राष्ट्राचा विकास, असे संघटनेचे बोधवाक्य असणार आहे. लोगो, ध्वज व बोधवाक्याचे अनावरण केल्यानंतर तुळजापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संघटनेच्या राज्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते झाले.