हजारो महिलांनी केले वारूळाचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:58+5:302021-08-13T04:36:58+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेत गुरुवारी हजारो महिलांनी नागोबाचा उपवास करीत नागोबा मंदिरासमोर वारूळाला ...
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेत गुरुवारी हजारो महिलांनी नागोबाचा उपवास करीत नागोबा मंदिरासमोर वारूळाला पांढरा धागा गुंडाळून वारूळाचे पूजन केले.
सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली नागोबाची यात्रा मानकऱ्यांच्या उपस्थितीत साजरी करावी लागत असून, यानिमित्त कंकण बांधणे, खरगा, आदी धार्मिक विधी पार पडले. नागोबा यात्रेत नागोबाच्या उपवासाला आधिक महत्त्व असून, स्थानिक महिला वारूळ पूजनासाठी सामाजिक अंतर राखत टप्प्याटप्प्याने दाखल होत होत्या. मंदिरासमोर दगडी शिळेमध्ये चार दिवसांपासून स्थानबद्ध असलेल्या साप, पाल, विंचू या उभयचर प्राण्यांचे मनोभावे पूजन करून भाऊ-बहिणीचे नातेसंबंध अखंडपणे टिकून राहू दे, ही भावना मनाशी बाळगत महिलांनी भाऊ-बहीण नात्याचे प्रतीक समजले जाणारा पांढरा धागा वारूळाला गुंडाळला.
शुक्रवारी नागपंचमी असून, यानिमित्त पहाटे पाच वाजता मंदिरारातील मूर्तीस महा अभिषेक घालण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता मानकरी व सेवाधारी मंडळींच्या मोजक्या उपस्थितीत गण, भाकणूक, महाआरती, आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करीत यात्रा यशस्वी करण्यासाठी सरपंच रामेश्वर तोडकरी, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी सभापती संतोष बोबडे, उपसरपंच आनंद बोबडे, ग्रामविकास आधिकारी श्रीशैल्य कोठे, सिध्देश्वर तानवडे, पिंटू तानवडे, बत्तास पाटील, अरविंद भडगे, बंडू तानवडे, रमेश लिंगफोडे, अप्पा लिंगफोडे, बाळासाहेब तानवडे, आप्पा डोके, योगेश काडगावकर, सोमा तोडकरी, विजय तानवडे, हरिदास डोके, गंगाधर गाभणे, पोलीस पाटील, समाधान डोके, दिलीप स्वामी, अनिल गाभणे, आदी सेवाधारी भजनी मंडळातील सदस्य परिश्रम घेत आहेत.
चौकट
महिलांना फराळाचे वाटप
नागोबा मंदिरालगत वारूळ पूजनासाठी आलेल्या महिलांना सावरगाव येथील दत्तात्रय लिंगफोडे यांच्यावतीने २०० किलो साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. ही सेवा देण्यासाठी दत्तात्रय लिंगफोडे, उपसरपंच आनंद बोबडे, रमेश तानवडे, नागनाथ तानवडे, सुधाकर तानवडे, अविनाश कानवले, दत्ता कुंभार, ललिता काडगावकर, सोमा लिंगफोडे, प्रमोद माने, बापू उंबरे, सूरज ढेकणे, बाळासाहेब डोके, आदींनी योगदान दिले.
चौकट
दीड हजार माळा तयार
नागोबा यात्रेत लिंबाऱ्याच्या माळेला अधिक महत्त्व असून, भाविक यात्रेत गळ्यात घालून मिरवत असत. नतंर ही माळ घरमध्ये वर्षभर अडकवून ठेवली जाते. यंदाच्या यात्रेसाठी मानकरी हरिदास डोके यांनी दीड हजार लिंबाऱ्याच्या गोलाकार माळा तयार करून ठेवल्या आहेत. त्या मोफत भक्तांना वाटप केल्या जातात. हे कार्य डोके कुटुंब तीन पिढ्यांपासून करीत आहेत.