'अल्पवयीन मुलीसोबत लग्न लावा,अन्यथा पळवून नेतो'; धमकी देणाऱ्या तरुणास पित्याने संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 04:54 PM2023-04-22T16:54:58+5:302023-04-22T16:55:32+5:30
विशेष म्हणजे, तरुणाचे लग्न झाले होते, तरीही दुसरे लग्न करण्यासाठी अल्पवयीन मुलीसाठी तो मागणी घालत धमकावत होता
उमरगा (जि. धाराशिव) : तालुक्यातील चिंचोली जहागीर येथे २६ मार्च रोजी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात उमरगा पोलिसांना अखेर यश आले आहे. या प्रकरणातील आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याची धमकी देत असल्याने तरुणाचा खून केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती गुरुवारी उमरगा पोलिसांनी दिली.
चिंचोली (जहागीर) येथील शंकर ममाळे (२८) हा चिंचोली रस्त्यालगत असलेल्या आपल्या शेडसमोर शनिवारी रात्री जेवण करून झोपला होता. मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून व हत्याराचा वापर करून खून केला. घटनास्थळी आरोपीने एकही पुरावा ठेवला नव्हता. त्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते. दरम्यान, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार तांत्रिक माहितीच्या आधारे ३५ ते ४० संशयितांची उमरगा पोलिसांनी चौकशी केली. यातून मयत शंकर हा दुसरे लग्न करण्यासाठी मुळज येथील आरोपी रमेश शंकर झंपले याच्याकडे त्याच्या मुलीसाठी आग्रह धरत होता. यावरून झंपले याने मारण्याची धमकी दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रमेश झंपले यास पाळत ठेवून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेच हा खून केल्याचे कबूल केले आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश राठोड यांनी गुरुवारी दिली आहे.
लग्न झाले असतानाही...
मयत तरुण शंकर ममाळे याचे लग्न झाले होते. तरीही दुसरे लग्न करण्यासाठी आरोपीच्या अल्पवयीन मुलीसाठी तो मागणी घालत होता. लग्न लावून न दिल्यास मुलीला पळवून नेण्याची धमकी मयत शंकर देत असल्याचे आरोपी रमेश झंपले याने तपासात पोलिसांना सांगितले.
आठ दिवस ठेवली पाळत...
शंकर हा सतत धमकी देत असल्याने त्याचा काटा काढण्याचा निर्धार आरोपी रमेश झंपले याने केला. यासाठी जवळपास आठ दिवस त्याच्यावर पाळत ठेवली. २५ मार्च रोजी रात्री तो शंकरच्या शेडपासून जवळच असलेल्या शेतात लपून बसला. शंकर झोपी गेल्यानंतर हातोडीने डोक्यात वार करून आरोपीने त्याचा खून केला. हे हत्यार ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक मनोज राठोड यांनी सांगितले.