कैद्यांनी पिकविलेल्या शेतीतून मिळते तीनशे दहा जणांना दोनवेळचे जेवण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:53+5:302021-07-15T04:22:53+5:30

उस्मानाबाद : येथील जिल्हा कारागृहात विविध गुन्ह्यांत अटकेत असलेल्या कैद्यांनी परिसरात शेती फुलविली असून, भाजीपाल्यासह इतर पिके घेतली जातात. ...

Three hundred and ten people get two meals a day from the farm grown by the prisoners! | कैद्यांनी पिकविलेल्या शेतीतून मिळते तीनशे दहा जणांना दोनवेळचे जेवण !

कैद्यांनी पिकविलेल्या शेतीतून मिळते तीनशे दहा जणांना दोनवेळचे जेवण !

googlenewsNext

उस्मानाबाद : येथील जिल्हा कारागृहात विविध गुन्ह्यांत अटकेत असलेल्या कैद्यांनी परिसरात शेती फुलविली असून, भाजीपाल्यासह इतर पिके घेतली जातात. इथे पिकणाऱ्या फळभाज्या दैनंदिन आहारात वापरल्या जात आहेत. सध्या जिल्हा कारागृहातील ३१० बंदीजणांचे दोन वेळचे जेवण भागत आहे.

शहरातील जिल्हा कारागृहाची क्षमता २६९ आहे. विविध गुन्ह्यांतील ३१० कैदी आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कारागृहावर ताण येत आहे. कारागृह परिसरात ९ एकर २५ गुंठे जागा शेतीसाठी आहे. अनेक वर्षांपासून तेथे विविध पिके घेतली जात आहेत. १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत मेथी, करडी, राजगिरा, पालक, शेपू या पालेभाज्या व डांगर, दुधी भोपळा, वांगी, मुळा, भेंडी, शेवगा, टोमॅटो, फ्लाॅवर या फळभाज्यांची लागवड करण्यात आली होती. यातून ५ लाख ४० हजार ७९० रुपयांचे उत्पादन काढण्यात आले आहे. कामासाठी कमीत कमी मनुष्यबळ, वेळेत पिकांची लागवड, मशागत, निगा यामुळे उत्पादन वाढते. सद्य:स्थितीत शेवगा, डांगर, वांगी असे फळभाज्यांचे उत्पादन सुरू आहे. कोरोना काळात जिल्हा कारागृहातील तीनशे दहा बंदीजणांचे दोनवेळचे जेवण भागत आहे.

सोलापूर, लातूर कारागृहात केला जात होता पुरवठा

उस्मानाबाद जिल्हा कारागृहातील ९ एकर २५ गुंठे शेतीसाठी जागा आहे. या ठिकाणी विविध पिकांची लागवड केली जात असते.

मागील दोन-तीन वर्षांत सातत्याने मेथी, करडी, राजगिरा, पालक, शेपू या पालेभाज्या व डांगर, दुधी भोपळा, वांगी, मुळा, भेंडी, शेवगा, टोमॅटो, फ्लाॅवर या फळभाज्यांची लागवड केली जात आहे. येथील जिल्हा कारागृहातील कैद्यांचे दोनवेळेचे जेवण भागून अतिरिक्त फळभाज्या लातूर व सोलापूर येथील कारागृहात पाठविल्या जात होत्या. यातून तेथील कैद्यांची भूक भागविली जाते; मात्र सध्या उस्मानाबाद जिल्हा कारागृहातील कैद्यांपुरताच भाजीपाल्याचे उत्पादन होत आहे.

कोरोना काळात ५ लाखांचे उत्पादन

१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च या कालावधीत कारागृह प्रशासनाने बियाणे, खते, बंदी मंजुरीसाठी ९१ हजार ७६४ रुपये खर्च केला होता. सुयोग्य नियोजनातून ५ लाख ४० हजार ७९० रुपये उत्पादन घेतले आहे. मागील तीन वर्षीच्या तुलनेत उत्पादन काहीअंशी घट झाली आहे. कोरोना संसर्गामुळे काही निर्बंध आल्याने उत्पादन घटले असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा झाला गौरव

मागील तीन आर्थिक वर्षात जिल्हा कारागृहाच्या वतीने विक्रमी उत्पादन घेतल्याने कारागृह प्रशासनाने याची दखल घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला होता. सध्या कृषी विभागाच्या कृषी सहायकांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह प्रशासनाच्या देखरेखीखाली कारागृह शेतीत उत्पादन घेतले जात आहे.

कोट...

सुयोग्य पाण्याचे नियोजन कृषी विभागाचे कृषी सहायक यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह प्रशासनाच्या देखरेखीखाली कारागृह शेतीत उत्पादन घेतले जाते. उस्मानाबाद कारागृहासह लातूर व सोलापूर कारागृहात येथील भाजीपाला पाठविला जात होता. सध्या कोरोना संसर्गामुळे कारागृहापुरताच भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. सध्या डांगर भोपळा, शेवगा, वांगी फळभाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे. तसेच उर्वरित क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेतले आहे.

एकनाथ शिंदे, कारागृह अधीक्षक, उस्मानाबाद

Web Title: Three hundred and ten people get two meals a day from the farm grown by the prisoners!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.