पैशाच्या व्यवहारातून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत तिघांना पळवून नेण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 02:17 PM2019-05-08T14:17:04+5:302019-05-08T14:30:54+5:30
पीडितांनी आरडाओरड केल्याने आरोपींनी या तिघांनाही सोडून पळ काढला.
उस्मानाबाद : सहा लाख रुपयांसाठी चाकू, तलवार व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत तिघांना कारमधून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान पीडितांनी आरडाओरड केल्याने आरोपींनी या तिघांनाही सोडून पळ काढला. ही घटना वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथे घडली. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण रामा शिंदे, संजय रामा शिंदे (दोघे रा. पिंपळगाव क) आणि गुलाब चव्हाण (रा. ढोकी) हे तिघे १ मे रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास वाशी तालुक्यातील खामकरवाडी पारधी पेढी येथे आले. यावेळी त्यांनी तेथील अनिल काळे व अन्य दोन महिलांना बळजबरीने एका कारमध्ये बसवले. तसेच तुम्ही आमचे सहा लाख रुपये द्या नाहीतर तुम्हाला जिवे मारून टाकू, म्हणत हातातील चाकू, काठ्या, तलवार, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकी दिली.
यानंतर या तिघांनाही गाडीत घालून पळवून नेले. दरम्यान, मनुष्यबळ पाटीजवळ आल्यानंतर अनिल काळे व दोन महिलांनी आरडाओरड केल्यामुळे आरोपींनी त्यांना सोडून दिले.
याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी येरमाळा पोलीस ठाण्यात वरील तिघांविरूद्ध भादंवि कलम ३६५, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.