जिल्हाधिकार्यांच्या नावे वायरल मेसेज फेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:31 AM2021-05-01T04:31:39+5:302021-05-01T04:31:39+5:30
उस्मानाबाद : सध्या सोशल मीडियात खोडसाळपणाचा अतिरेक केला जातोय. उस्मानाबाद जिल्हाधिकार्यांच्या नावे काही सूचना लिहून त्या सर्वत्र प्रसारित केल्या ...
उस्मानाबाद : सध्या सोशल मीडियात खोडसाळपणाचा अतिरेक केला जातोय. उस्मानाबाद जिल्हाधिकार्यांच्या नावे काही सूचना लिहून त्या सर्वत्र प्रसारित केल्या जात आहेत. अशा पद्धतीने आपण कधीही सूचना करीत नाही, तो मेसेज आपला नसल्याचा निर्वाळा शुक्रवारी स्वत: जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगाकवर यांनी दिला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातही उस्मानाबाद जिल्हाधिकार्यांनी सध्याच्या काळात काय करणे टाळावे, याबाबतच्या सूचना दिल्याचे सांगून खाली अनावश्यक गोष्टींचा भरणा केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. यासदंर्भातील फॅक्ट चेक करण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा मेसेज आपला नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले. नागरिकांना प्रशासनाकडून ज्या काही सूचना द्यायच्या असतात त्या लेखी स्वरुपात जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात येतात. अशा पद्धतीने सोशल मीडियातून सूचना केल्या जात नाहीत, असेही जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी नमूद केले.
कोट...
वृत्तपत्रांच्या बाबतीत सांगावयाचे झाले तर यातून संसर्गाचा प्रसार होतो, असे अद्यापही समोर आलेले नाही. मी स्वत: दररोज किमान तीन तरी वृत्तपत्रे वाचत असतो. अशा काळात वृत्तपत्रांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक व उपयुक्त माहिती मिळत असते.
-कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी