' आंदोलन करून कंटाळलो, आता...'; मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याने संपवले जीवन
By बाबुराव चव्हाण | Updated: November 17, 2023 17:29 IST2023-11-17T17:29:32+5:302023-11-17T17:29:53+5:30
मराठा आरक्षणासाठी ४० वर्षीय शेतकऱ्याने घेतला गळफास

' आंदोलन करून कंटाळलो, आता...'; मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याने संपवले जीवन
वाशी (जि. धाराशिव) : मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील सरमकुंडी येथील ४० वर्षिय शेतकऱ्याने आंब्याच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १७ नाेव्हेंबर राेजी उघडकीस आली. या प्रकरणी वाशी ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
सरमकुंडी येथील विनोद त्रिंबक गायकवाड (४०) हे शेतीसाेबतच टेम्पाे चालक म्हणून काम करीत हाेते. त्यांनी सरमकुंडी-तांदुळवाडी राेडलगत असलेल्या शेतात आंब्याच्या झाडाला दाेरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १७ नाेव्हेंबर राेजी उघडकीस येताच, वाशी पाेलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पाेलिसांना घटनास्थळी चिठ्ठी आढळून आली. ‘‘माझ्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देत नाही. मी आता आंदाेलन करून कंटाळलाे आहे. त्यामुळे मी मरून जात आहे. मी फाशी घेतली आहे.’’ अशा स्वरूपाचा मजकूर ‘त्या’ चिठ्ठीमध्ये आहे. यानंतर पाेलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वाशी ग्रामीण रूग्णालयात पाठविले. वैद्यकीय अधिकारी प्रमाेद शिंदे यांनी उत्तरीय तपासणी केली. गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.