आजचं भागलं; उद्याचं काय? लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:32 AM2021-04-27T04:32:56+5:302021-04-27T04:32:56+5:30
उस्मानाबाद : मागणीच्या तुलनेत जिल्ह्यास लस मिळत नसल्याने नागरिकांना केंद्रावरून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत १४ ...
उस्मानाबाद : मागणीच्या तुलनेत जिल्ह्यास लस मिळत नसल्याने नागरिकांना केंद्रावरून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत १४ हजार व्यक्तींचे लसीकरण झाले. केवळ ७०० लस उपलब्ध असल्याने मंगळवारी अनेक केंद्रे बंद ठेवण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर येऊ शकते. लसीचा पुरवठा नियमित न झाल्यास १ मेपासून काय होणार? असा प्रश्नही आता नागरिकांतून केला जाऊ लागला आहे.
कोरोना संसर्गापासून बचाव, करण्याकरिता शासन व प्रशासनाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस टोचण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने नागरिकांचा लसीकरण करून घेण्याकडे कल वाढला. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होतेय. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे शिवाय, लसीची मागणी करण्यात येत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रविवारी १५ हजार लस आरोग्य विभागास प्राप्त झाली होती. सोमवारी दिवसभरात १४ हजार २९८ जणांचे लसीकरण झाले. त्यामुळे सद्य:स्थितीत केवळ ७०२ लस उपलब्ध आहेत. त्यामुळे मंगळवारी लस प्राप्त न झाल्यास अनेक केंद्रे बंद करण्याची वेळ आरोग्य विभागावर येऊ शकते. केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांपुढील व्यक्तींना लस देण्याची घोषणा केली आहे. सर्व नागरिकांना लस मिळण्यासाठी नियमित पुरवठा होणे गरजेचे आहे.
अशी आहे आकडेवारी
११५ सध्या सुरु असलेले केंद्र
२१९ जिल्ह्यातील एकूण लसीकरण केंद्र
१२००० जणांना दररोज लस देण्याचे उद्दिष्ट
१२००० जणांना प्रत्यक्षात लस दिली जाते
आतापर्यंत २३ टक्के टार्गेट पूर्ण
१ मे नंतरचे नियोजन काय
जिल्ह्यात सध्या २११ सरकारी व ८ खासगी असे एकूण २१९ लसीकरण केंद्र आहेत. या केंद्रावरून ४५ वर्षांपुढील व्यक्तींना लस दिली जात आहे.
१ मेपासून जिल्हयातील १८ ते ४४ वयोगटांतील १३ लाख ११ हजार ७२६ नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. यासोबतच ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी आता ग्रामीण भागातही लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रतिदिन २० हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट राहील.
कोट...
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू असून, आतापर्यंत १ लाख ४९ हजार ५९८ जणांचे लसीकरण झाले आहे. मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी होत आहे. मात्र, लसीकरण सुरळीत सुरू आहे. सध्या १ लाख लसीची मागणी केली आहे.
डॉ. कुलदीप मिटकरी,
लसीकरण अधिकारी
१) जिल्ह्यातील ४५ वर्षांपुढील १ लाख २८ हजार १६४ नागरिकांनी २६ एप्रिलपर्यंत लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस २१ हजार ४३४ व्यक्तींनी घेतला असून, एकूण १ लाख ५९ हजार ५९८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
२) १८ ते ४४ वयोगटांतील १३ लाख ११ हजार व्यक्तींचे १ मेपासून लसीकरण सुरू होणार आहे. लसीचा पुरवठा सुरळीत न झाल्यास लसीकरण मोहिमेला ब्रेक बसू शकतो.
३ प्रत्येक व्यक्तीला लस घेता यावी, यासाठी जिल्ह्यात २१९ लसीकरण केंद्र सुरू असून, १ मेनंतर आणखी २६ केंद्रे वाढण्याची शक्यता आहे तसेच शासनाने शाळांमध्ये लस देण्यास परवानगी दिल्यास प्रत्येक गावांमध्ये लसीकरण केंद्र होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.