स्वच्छतागृह बनले कचरा कुंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:26 AM2020-12-25T04:26:05+5:302020-12-25T04:26:05+5:30
(फोटो - सुमेध वाघमारे २४) तेर : सध्या जिल्हाभरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर गुडमॉर्निंग पथकांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत ...
(फोटो - सुमेध वाघमारे २४)
तेर : सध्या जिल्हाभरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर गुडमॉर्निंग पथकांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. परंतु, तेर येथील तलाठी कार्यालयातील स्वच्छतागृह मात्र वापराअभावी धूळखात पडले असून, याचा वापर सध्या कचराकुंडीसारखा केला जात आहे.
सध्या घर तेथे शाैचालय व त्याचा वापर ही मोहीम राबविली जात आहे. जे नागरिक शौचासाठी उघड्यावर जातात त्यांच्यावर गुडमॉर्निंग पथकांच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. परंतु, तेर येथील तलाठी कार्यालयातील स्वच्छतागृहाचा वापर कचराकुंडी म्हणून केला जात आहे. त्यामुळे नियम केवळ नागरिकांसाठीच असून, शासकीय कार्यालयाला सूट आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. वास्तविक या कार्यालयात नागरिकांची नियमित वर्दळ असते. तरीही उपलब्ध शौचालयाचा वापर होत नसल्यचे दिसून येत आहे.
(चाैकट)
स्वच्छतागृहाचा हौदही उघडाच
तलाठी कार्यालयातील स्वच्छतागृहाचा हौद सध्या पूर्णत: भरलेला असून, त्यावर झाकण नसल्याने दुर्घटना घडू शकते. त्यामुळे या हाैदावर झाकण बसविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.