आरोग्य केंद्राच्या टोलेजंग इमारतीला लागली गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:12+5:302021-07-16T04:23:12+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या इमारतीला पाच वर्षातच पावसामुळे ...
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या इमारतीला पाच वर्षातच पावसामुळे गळती लागली आहे. यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने १ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यानंतर ठेकेदारामार्फत सन २०१६मध्ये हे काम पूर्ण करण्यात आले. या इमारतीचा देखभालीचा कालावधी तीन वर्षांचा होता. तो आता संपला असून, तब्बल पाच वर्षांनंतर ओपीडीसमोर सिमेंट छताला तसेच रुग्ण दाखल करावयाच्या वॉर्डात पावसामुळे गळती लागल्याचे दिसत आहे. इमारत टोलेजंग बांधली असली तरी गळती लागल्याने अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीस गळती लागल्याचे समजताच सरपंच रामेश्वर तोडकरी यांनी भेट देऊन पाहणी केली.
कोट.....आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इमारतीच्या छतातून गळती लागल्याचा प्रकार समोर आला. कर्मचाऱ्यांना गळतीच्या ठिकाणी बादली ठेवून गळणाऱ्या पाण्याची साठवण करावी लागत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून पाण्याची गळती थांबवावी.
- रामेश्वर तोडकरी, सरपंच
चौकट
सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला बऱ्याच दिवसांपासून पावसाळ्यात गळती लागते. यासंदर्भात बांधकाम विभागाकडे लेखी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- डॉ. एस. एम. माशाळकर, वैद्यकीय अधिकारी, सावरगाव