एकेका मतांसाठी टफ फाईट; ‘आयसीयू’तील मतदार ॲम्ब्युलन्समधून थेट मतदान केंद्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 07:04 PM2022-02-21T19:04:44+5:302022-02-21T19:05:21+5:30
सरळसरळ लढत होत असल्याने दोन्ही बाजूने काही मतदारांना ‘सहल’ घडवली होती, तर काही मतदार वैयक्तिक अडचणी सांगत घरीच थांबले होते
कळंब (जि. उस्मानाबाद) -जिल्हा बँक निवडणुकीचा एकतर्फी वाटणारा सामना अंतिम टप्प्यात मात्र भलताच ‘टफ मॅच’ ठरला आहे. एकेका मतासाठी सर्व मार्गाने प्रयत्न झाले. यातच सौंदना अंबा येथील एका अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्ण मतदाराने थेट कार्डियाक ॲम्ब्युलन्स मतदान केंद्र गाठले अन् आपला मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा असा सामना रंगला होता. कळंब तालुक्याचा विचार केला तर यास भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील विरूद्ध महाविकास आघाडी असेच चित्र दिसून येत होते. यामुळेच सोसायटी मतदारसंघातील ७० व इतर संस्था मतदारसंघातील ६० अशा एकूण १३० मतदारांना चांगलाच भाव आला होता. यात सरळसरळ लढत होत असल्याने दोन्ही बाजूने काही मतदारांना ‘सहल’ घडवली होती, तर काही मतदार वैयक्तिक अडचणी सांगत घरीच थांबले होते. या स्थितीत रविवारी प्रत्यक्ष मतदानाच्या दुपारच्या सुमारास महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा हा सामना एकतर्फी न होता बिग फाईट असल्याचे दिसले. यामुळे मतदान केंद्रांकडे येणाऱ्या प्रत्येक मतदारांच्या संदर्भात ‘क्लायमॅक्स’ वाढत होता. यातच अचानक एक सायरन वाजवत ॲम्ब्युलन्स मतदान केंद्र असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात दाखल झाली. यामध्ये कोण होते? तर सौंदना अंबा (ता. कळंब) येथील सोसायटी मतदारसंघातील मतदार होते.
आयसीयूमधून आले, पण मतदान केलेच...
सौंदना, लासरा व वाकडी (इस्थळ ) या तीन गावची ग्रुप सोसायटी आहे. या संस्थेचा बँक निवडणुकीसाठी मधुकर भाऊराव पालकर यांच्या नावे ठराव होता. मात्र, निवडणुकीच्या ऐन धामधुमीत त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. यानंतर लातूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या स्थितीत त्यांनी रविवारी दुपारी ॲम्ब्युलन्समधून कळंब गाठले अन् मतदान केले.
मतदान केंद्र अधिकारी रुग्णवाहिकेत पोहोचले..
बँक निवडणुकीत मतदानासाठी थेट ॲम्ब्युलन्सने कळंब येथील मतदार केंद्रावर दाखल झाल्यानंतर मतदान केंद्र अधिकारी, सहायक मतदान अधिकारी अशा कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी इमारतीमधून खाली येत ॲम्ब्युलन्स गाठली. याठिकाणी त्यांनी मतदान प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे पालकर यांना मतदानाचा हक्क बजावता आला.