कलिंगडाच्या शेतीत फिरविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:32 AM2021-02-10T04:32:39+5:302021-02-10T04:32:39+5:30

तामलवाडी : अतिवृष्टीचा फटका सहन करीत मोठ्या कष्टाने तीन एकर जमिनीत कलिंगडाची लागवड करून त्याची जोपासना केली, परंतु आता ...

Tractor rotated in watermelon field | कलिंगडाच्या शेतीत फिरविला ट्रॅक्टर

कलिंगडाच्या शेतीत फिरविला ट्रॅक्टर

googlenewsNext

तामलवाडी : अतिवृष्टीचा फटका सहन करीत मोठ्या कष्टाने तीन एकर जमिनीत कलिंगडाची लागवड करून त्याची जोपासना केली, परंतु आता बाजारात गेल्यावर कलिंगडाला प्रति किलो केवळ तीन रुपये भाव मिळू लागल्याने लागवडीचा खर्चही पदरी पडणे मुश्कील झाले. त्यामुळे अखेर या तीन एकरांतील कलिंगडाच्या शेतीवर ट्रॅक्टर फिरवून जमीन मोकळी करण्याची वेळ तुळजापूर तालुक्यातील सूरतगाव येथील शेतकऱ्यावर आली आहे. तुळजापूर तालुक्यातील सूरतगाव येथील ज्ञानेश्वर नारायण गुंड यांनी तीन एकर काळरान जमिनीवर शुगर क्वीन जातीच्या कलिंगडाची लागवड ठिबक सिंचनाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यात केली होती. याची उत्तम प्रकारे जोपासना केली. यासाठी त्यांनी दोन लाख चाळीस हजार रुपये खर्च केला. फळधारणा चांगली झाल्यामुळे उतारा मोठा मिळेल व यातून चांगले उत्पन्न हातात पडेल, अशी त्यांना अपेक्षा होती.

दरम्यान, त्यांनी कलिंगडे बाजारात नेल्यानंतर तिथे मात्र प्रती किलो केवळ तीन रुपये दर मिळाला. त्यामुळे ८० एकरांतील कलिंगडासाठी जवळपास अडीच लाख रुपये खर्च करून पदरी मात्र केवळ ८० हजार रुपये पडत असल्याने व यातून तोडणी, वाहतूक खर्चही निघत नसल्याने ज्ञानेश्वर गुंड यांनी सोमवारी या कलिंगडाच्या शेतीवर ट्रॅक्टर फिरवून शेती रिकामी केली.

कोट....

कलिंगड उत्पादनातून चांगला पैसा हातात येईल, या अपेक्षेने मोठ्या कष्टाने जोपासना केली होती, परंतु प्रत्यक्षात बाजारातील दर पाहिल्यानंतर उत्पादनापेक्षा खर्चच जादा होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शेवटी ट्रॅक्टर फिरवून कलिंगडाची शेती रिकामी करावी लागली.

- ज्ञानेश्वर गुंड, शेतकरी

Web Title: Tractor rotated in watermelon field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.