शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३० एकर जमीन हस्तांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:35+5:302021-07-14T04:37:35+5:30
उस्मानाबाद : येथील १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास सलग्न ४३० रुग्ण खाटांच्या रुग्णालयास राज्य शासनानी ...
उस्मानाबाद : येथील १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास सलग्न ४३० रुग्ण खाटांच्या रुग्णालयास राज्य शासनानी मंजुरी दिली आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि राज्य शासनाच्या नावे नोंद असलेली ३० एकर जमीन देखील वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास आता नक्कीच गती मिळणार आहे.
या महाविद्यालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थावर व जंगम मालमत्ता नि:शुल्क वापरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर महसूल विभागाच्या सहमतीने येथील जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्याअनुषंगाने येथील जिल्हाधिकारी यांच्या दि. २८ मे २०२१ च्या आदेशानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापण्यासाठी उस्मानाबाद शहरातील शासकीय जमीन सर्व्हे नंबर १० मधील २.९७ हेक्टर आर आणि ७५९ मधील १.०९ हेक्टर आर अशी एकूण ४.०५ हेक्टर आर (१० एकर) जागा मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेचे संचालक यांच्याकडे हस्तांतरित केली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भविष्यातील श्रेणीवर्धन तसेच इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम (नर्सिंग, फिजिओथेरेपी, बीएस्सी. पीएमटी इत्यादी) नव्याने सुरू करण्याकरिता अतिरिक्त २० एकर जागेची मागणी वैद्यकीय शिक्षण व संशोधनच्या संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. ७ जुलै रोजी झालेल्या आढावा बैठकीमध्ये वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ही २० एकर जमीन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेकडे तातडीने हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते. या जमिनीच्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जागेची पाहणी करून उस्मानाबाद शहरातील शासनाच्या नावे नोंद असलेली सर्व्हे नंबर ४२६ मधील शहर विकास आराखड्यातील आरक्षण वगळून वाटपास शिल्लक असलेली २० एकर जमीन वैद्यकीय शिक्षण व संशोधन, संस्थेच्या नावे हस्तांतरित करण्यात आली आहे. ही जागा सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता शेखर राजदेरकर यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ताब्यात असलेली सहा हेक्टर ४० आर जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही शासन स्तरावर करण्यात येत आहे.
चौकट......
पाठपुराव्याला आले यश
पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अधीक्षक भूमी अभिलेख उस्मानाबादचे तहसीलदार, नगर रचनाकार, उस्मानाबाद न.प.चे मुख्याधिकारी यांच्या चमूने वेळेत प्रक्रिया पूर्ण करून एकूण ३० एकर शासकीय जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावे करून त्यांच्या ताब्यात दिली आहे. यामुळे उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीस गती प्राप्त झाली आहे. जिल्ह्याचे खासदार आणि सर्व आमदार (विधान परिषद व विधानसभा) यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीबाबत पाठपुरावा केला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत या पुढील कार्यवाही केली जात आहे.