तहसीलदार गणेश माळींची बदली, 'इनाम'धारकांचा श्वास मोकळा
By चेतनकुमार धनुरे | Published: April 13, 2023 07:36 PM2023-04-13T19:36:19+5:302023-04-13T19:36:33+5:30
वाळूसाठा प्रकरणात तहसिदारांनी एका कार्यकर्त्यास श्रीमुखात भडकविल्याची चर्चा दीर्घकाळ चालली.
धाराशिव : येथील तहसीलदार गणेश माळी यांची बुधवारी रात्री निघालेल्या आदेशान्वये बदली झाली आहे. त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही. दरम्यान, त्यांच्या बदलीमुळे प्रामुख्याने इनामी जमीनधारकांनी मोकळा श्वास घेतला आहे. काही निर्णय व बेधडक वृत्तीमुळे माळी हे कायम चर्चेत राहिले.
धाराशिवचे तहसीलदार गणेश माळी हे बेडर अधिकारी म्हणून परिचित होते. वाळूसाठा प्रकरणात त्यांनी एका कार्यकर्त्यास श्रीमुखात भडकविल्याची चर्चा दीर्घकाळ चालली. तेथून ते अधिक चर्चेत आले. लोकप्रतिनिधींना न जुमानणारे म्हणूनही ते ओळखले गेले. इनामी जमिनी बेकायदेशीरपणे नावे लावून घेत त्यांचे व्यवहार केल्याबद्दल अनेक जमीनधारकांना अलिकडेच नोटिसा बजावल्या होत्या. लाखो रुपयांचा महसुली नजराणा भरण्याची तंबी देतानाच २५ टक्के दंडही लावून त्यांनी इनामी जमीनधारकांत खळबळ उडवून दिली होती. अशाच वेगवेगळ्या प्रकरणांनी ते कायम चर्चेत राहिले. त्यांची बदली झाल्याने अनेकांनी मोकळा श्वास घेतला आहे. आता त्यांच्या जागी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील तहसीलदार शिवानंद बिडवे हे येत असून, लवकरच ते पदभार घेणार आहेत.