दोन चारचाकी वाहनांतून प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखूची वाहतूक
By शेखर पानसरे | Published: October 1, 2023 04:11 PM2023-10-01T16:11:45+5:302023-10-01T16:11:56+5:30
२४ लाख २९ हजार ९९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
घारगाव : प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखू आणि प्रतिबंधित मालाची वाहतूक होत असलेली दोन चारचाकी वाहने, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण २४ लाख २९ हजार ९९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी (दि.०१) पहाटेच्या सुमारास संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुटवाडी गावच्या शिवारात कोटमारा धरणाचे कडेला ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झालेले कोल्हापूर आणि अकोले (अहमदनगर) येथील आहेत.
पीकअप आणि कारमधून प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखू कोल्हापूर येथून नाशिक-पुणे महामार्गाने बोटा मार्गे अकोले तालुक्यात नेण्यात येत होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष खैरे, विजय ठोंबरे, पोलिस कॉस्टेबल रणजित जाधव, रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे यांनी ही कारवाई केली.