रस्ता दुभाजकांमधील झाडे पाण्याअभावी सुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:53+5:302021-05-29T04:24:53+5:30

उमरगा : शहारातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुभाजकामध्ये दोन वर्षांपूर्वी शाळा, महाविद्यालय तसेच विविध संस्थांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड ...

The trees in the road dividers dried up due to lack of water | रस्ता दुभाजकांमधील झाडे पाण्याअभावी सुकली

रस्ता दुभाजकांमधील झाडे पाण्याअभावी सुकली

googlenewsNext

उमरगा : शहारातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुभाजकामध्ये दोन वर्षांपूर्वी शाळा, महाविद्यालय तसेच विविध संस्थांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली होती. परंतु, सद्य:स्थितीत केवळ या झाडांना पाणी मिळत नसल्यामुळे ही झाडे वाळून जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात पालिकेच्या वतीने शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुभाजकात शोभेची झाडे लावण्यात आली. यासाठी लाखो रुपये खर्च करून ही झाडे आंध्र प्रदेशमधील नर्सरीतून या झाडांची खरेदी करण्यात आली होती. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक डॉ. उदयसिंह मोरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी याचा मोठा गाजावाजादेखील केला होता. ही झाडे लावण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग, रोटरी क्लब, व्यापारी महासंघ यांच्यासह शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचेदेखील सहकार्य घेण्यात आले होते. दुभाजकात झाडे लावल्यानंतर पावसाळा संपेपर्यंत ही झाडे उत्तमरीत्या वाढली. यामुळे शहराच्या सौंदर्यात चांगली भर पडणार होती. परंतु, दुभाजकाला कुठेच जाळी नसल्याने झाडे मोकाट जनावरांकडून या झाडांची नासधूस होऊ लागली.

यावेळी झाडाच्या सुरक्षिततेसाठी या दुभाजकाला लोखंडी बॅरिके‌ड‌्स बसविण्याची मागणी पुढे आली. परंतु, जवळपास चार किमी अंतर असलेल्या दुभाजकावर बॅरिकेड‌्स लावण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. त्यावेळी पालिकेची उदासीनता लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी यासाठी वर्गणी गोळा केली. यातून बसस्थानक ते अण्णा भाऊ साठे चौक या जवळपास दीड कमी अंतरातील दुभाजकांवर त्यांनी लोखंडी बॅरिकेड‌्स उभारले. परंतु, उर्वरित दुभाजक तसेच राहून गेले. यानंतर पालिका प्रशासनाकडून या झाडांना पाणी देण्याचीही तसदी घेतली गेली नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत दुभाजकातील शोभेच्या झाडांपैकी ९० टक्के झाडे पाण्याअभावी कोमेजून गेलेली अथवा वाळून गेली आहेत. वास्तविक सध्या पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. शिवाय, पालिकेची अग्निशमनची गाडी दिवसरात्र पाण्याच्या टाकीजवळ थांबलेली असते. असे असतानाही पालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे या झाडांची दुरवस्था दिसून येत आहे. दरम्यान, यासंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.

कोट..........

दुभाजकांमधील झाडांचे संगोपन व्हावे यासाठी बॅरिकेड‌्स बसविणे आवश्यक होते. यासाठी व्यापारी महासंघाने वर्गणी गोळा करून काही प्रमाणात हातभार लावण्याचा प्रस्ताव पालिकेकडे मांडला होता. परंतु, पालिकेकडून यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही व्यापाऱ्यांनीच वर्गणी जमवून आपापल्या भागातील दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड‌्स बसवून घेतले. त्यामुळे थोडीफार झाडे टिकली. परंतु, त्याला पाणी नसल्यामुळे आता ती वाळून जात आहेत.

- नितीन होळे, कार्याध्यक्ष, व्यापारी महासंघ

ही झाडे चांगली चांगल्या प्रकारे बहरल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. परंतु, पालिकेकडे सगळी यंत्रणा असताना देखील झाडांना पाणी देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सर्वसामान्य नागरिक एवढ्या सगळ्या झाडांना पाणी देऊ शकत नाही. त्यामुळे पालिकेने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

- गिरीश दुप्पली, नागरिक

शहराच्या सौैंदर्यात भर पडेल तसेच वृक्ष लागवडीसाठी लोकांना चालना मिळेल, यासाठी आम्ही पुढाकर घेतला होता. त्यावेळी पालिकेतील सत्ताधारी व प्रशासनानेही चांगले सहकार्य केले. परंतु, नंतरच्या काळात या झाडाच्या संगोपनाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. दुभाजकावर बॅरिकेड‌्स लावण्याकडेही पालिकेने कानाडोळा केल्या. परिणामी पाण्याविना ही झाडे जळून गेली आहेत.

- डॉ. उदयसिंह मोरे, प्रशिक्षक, आर्ट ऑफ लिव्हिंग

Web Title: The trees in the road dividers dried up due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.