अंगणी तुळस, पारावर पिंपळ, वेशीवर वड अन् बांधावर लिंब...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:33 AM2021-05-18T04:33:24+5:302021-05-18T04:33:24+5:30
कळंब : मागच्या पिढीने जिथं माणसांचा राबता, तिथं वृक्षसंपदा जोपासली. त्यामुळे अंगणी तुळस, पारावर पिंपळ, वेशीवर वड, बांधावर लिंब, ...
कळंब : मागच्या पिढीने जिथं माणसांचा राबता, तिथं वृक्षसंपदा जोपासली. त्यामुळे अंगणी तुळस, पारावर पिंपळ, वेशीवर वड, बांधावर लिंब, अशी परिस्थिती गावागावात दिसून येत होती. जास्त ‘ऑक्सिजन’ देणाऱ्या या वृक्षांचे महत्त्व त्यांनी जाणले होते, हेच यावरून अधोरेखित होते. यामुळे ‘श्वास’ गुदमरत असलेल्या सध्याच्या पिढीने याचे अनुकरण करावे, असाच संदेश यातून मिळत आहे.
मनुष्यप्राणी, पशू, पक्षी अशा जैवविविधतेला ‘प्राणवायू’ देण्याचे काम याच सजीवसृष्टीतील वनस्पती करीत आल्या आहेत. वृक्षसंपदा घनदाट, तर पर्यावरण संतुलित अन् पर्यावरण समृद्ध, तर मानवी स्वास्थ्य धडधाकट, असे हे चक्र अनादि काळापासून चालत आलेले आहे.
संतांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे...’चा दाखला यातूनच दिला असावा. हे मागच्या पिढ्यांनी जाणलं होतं. म्हणूनच त्यांनी वृक्षसंपदा जपत आपला ‘अधिवास’ पर्यावरणपूरक केल्याचे दिसून येते.
मागच्या काही दशकांत गावगाड्यात ‘विकास’ घुसला. यामुळे गावे बदलली. असे असले तरी काही गावांत मागच्या पिढ्यांच्या खाणाखुणा अद्याप शिल्लक आहेत. गावात दाखल झाल्यानंतर दिसणारी घनदाट व डौलदार झाडे, ही यापैकीच एक. वेशीवर, नाक्यावर, मोक्यावर, चौकात अन् पारावर या टुमदार वृक्षांचे बीजारोपण मागच्या पिढ्यांनी केले. त्यातून उरल्यासुरल्या खुणांची सावली आजची ‘स्मार्ट’ पिढी घेत आहे.
विशेषतः वर्दळ व मोक्याच्या ठिकाणी लावलेली ही झाडे अधिक ऑक्सिजन देणारी आहेत. जीवनात प्राणवायूला असलेलं महत्त्व त्या पिढीला माहीत होतं हेच यावरून स्पष्ट होतं. सध्याच्या कोरोना संकटात ‘ऑक्सिजन’चा अभाव अन् यामुळे श्वास गुदमरलेले रुग्ण पाहिल्यावर ‘झाडं लावा, झाडं जगवा’ नव्हे, तर ‘झाडं लावा, माणसं जगवा’ असाच संदेश पुढच्या पिढीला ही वृक्षसंपदा देत आहे.
चौकट...
वृक्ष नव्हे, हे तर ‘ऑक्सिजन प्लांट’
अंगणात तुळस, पारावर पिंपळ, वेशीवर वड, विहिरीवर उंबर, बांधावर कडुलिंब, ओढ्यात जांभूळ हा मागच्या पिढीचा शिरस्ता होता. इतरांपेक्षा अधिक ऑक्सिजन देणारी ही झाडं. त्यातच गावाची लोकसंख्या जेमतेम. यामुळे गाव, पार अन् वेशीवर एकत्र यायचं, शेतात राबायचं अन् घरात स्थिरावायचं. नेमक्या अशाच ठिकाणी जास्त ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची मागच्या पिढ्यांनी लागवड केली. इटकूर, कन्हेरवाडी, मस्सा, शेवगाव, गंभीरवाडी, आडसूळवाडी, बहुला, मोहा अशा अनेक गावांत पार, वेस, चौकात असे जुन्या पिढीने कार्यान्वित केलेले ‘ऑक्सिजन प्लांट’च्या खुणा आजही आहेत.
या देशी वृक्षांचे महत्त्व जाणा
वटवृक्ष कुळातील वड, पिंपळ, उंबर, नांदुरकी यासह तुळस, कडुनिंब, अशोक, बांबू, जांभूळ, अर्जुन, कदंब आदी वृक्ष आदी जास्त काळ व जास्त क्षमतेने ऑक्सिजन देतात. यात २३ तासांपैकी साधारणतः २२ तास पिंपळ, तर इतर २० तासांच्या आसपास ऑक्सिजन देतात. जितकी पानं जास्त तितका प्राणवायू जास्त. यामुळेच आकाराने मोठे, पानाची संख्या जास्त असलेल्या पिंपळ, अक्षयवृक्ष अर्थात वडाचे स्थान यासंदर्भात मोठे मानाचे आहे. ही सारी देशी वृक्षसंपदा जुनी पिढी प्राधान्याने जोपासत आली होती.
वृक्ष, मनुष्य आणि ऑक्सिजन
रंग, गंध व चवहीन असलेलं ‘ऑक्सिजन’ मनुष्यासाठी ‘प्राणवायू’ आहे. शरीरात ९५ ते १०० असा प्राणवायूचा स्तर असेल तर शरीर कार्यक्षम राहते, सर्व अवयव चांगले काम करतात. अन्न-पाण्यातून १०, तर ऑक्सिजनमधून ९० टक्के ऊर्जा मिळते. श्वासातूून घेतल्या जाणाऱ्या हवेत २० टक्के ऑक्सिजन असतो. एक मनुष्य साधारणतः मिनिटाला पंधरा, तर दिवसाला २१ हजार ६०० श्वास घेतो. एकूणच माणसाला दिवसाला ५५० लिटर ऑक्सिजन लागतो. आता झाडाचा विचार केला, तर एक झाड प्रतिदिन किमान २३० ते ४०० लिटर ऑक्सिजन देते. एक पान एका तासात पाच मिलिलिटरपेक्षा जास्त ऑक्सिजन देते. वायुमंडलात ७८ टक्के नायट्रोजन व २१ टक्के ऑक्सिजन असतो. यातील ७० ते ८० टक्के ऑक्सिजन समुद्री वनस्पती देतात. जमिनीवरील वनस्पतीचा यात वाटा तुलनेने कमी आहे. यामुळे दररोज घटत चाललेली वृक्षसंपदा हे किती धोकादायक आहे, हे यावरून लक्षात येते.