तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा पूर्ण; घटस्थापनेने आजपासून शारदीय नवरात्रौसवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 01:30 PM2020-10-17T13:30:46+5:302020-10-17T13:32:32+5:30
Tulja Bhavani Mata Navratri १८ व १९ आॅक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना हे विधी असतील़
तुळजापूर (जि़ उस्मानाबाद) : ९ आॅक्टोबर रोजी सुरु झालेली तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा शनिवारी पहाटे पूर्ण झाली. यानंतर पूर्ववत सिंहासनावर मूर्ती प्रतिष्ठापना करून शनिवारी दुपारी घटस्थापनेने नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्री साधेपणाने साजरी होत आहे़ त्यामुळे बाहेरील भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी तुळजापुरात प्रवेश बंदी आहे़
१७ आॅक्टोबर रोजी तुळजाभवानी देवीची पहाटे मंचकी निद्रा संपुष्टात आली. त्यानंतर सिंहासनावर मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली जाईल़ दुपारी १२ वाजता घटस्थापना होताच नवरात्रीस सुरुवात होणार आहे़ १८ व १९ आॅक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना हे विधी असतील़ २० रोजी ललित पंचमीनिमित्त रथालंकार महापूजा व रात्री छबिना, २१ रोजी मुरली अलंकार महापूजा व रात्री छबिना, २२ रोजी विशेष शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबिना, २३ रोजी विशेष भवानी तलवार अलंकार महापूजा व रात्री छबिना, २४ रोजी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा व पहाटे २ वाजता होमहवनास प्रारंभ, असे कार्यक्रम आहेत़ तसेच सकाळी ७ वाजून ५ मिनिटास पूर्णाहुती व रात्री छबिना, २५ रोजी महानवमीनिमित्त देवीची नित्योपचार अलंकार महापूजा व दुपारी १२ वाजता होमावर धार्मिक विधी करून घटोत्थापन होईल़ याच दिवशी रात्री नगरहून आलेल्या पलंग पालखीची मिरवणूक होईल़
१ नोव्हेंबर रोजी होणार उत्सवाची सांगता
३० आॅक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी उत्तररात्री देवी मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येईल़ ३१ रोजी श्री तुळजा भवानी मंदिर पौर्णिमेला रात्री सोलापूर येथील काठ्यांसह छबिना व महंतांचा जोगवा होणार आहे़ १ नोव्हेंबर रोजी अन्नदान व रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबिना व शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता करण्यात येणार आहे़