पूरग्रस्त महिलांच्या मदतीला धावली तुळजाभवानी; मंदिर ट्रस्ट पाठविणार २५ हजार साड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 03:55 PM2021-08-20T15:55:57+5:302021-08-20T16:00:39+5:30
Tulja Bhavani Temple : जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिकांना तर आवाहन केलेच, शिवाय तुळजाभवानीलाही साकडे घातले.
उस्मानाबाद : देव माणसातच आहे. देवत्वाची प्रचीती ही संकटसमयी एकमेकांच्या मदतीला धावून जाण्यातूनच येत असते. याचीच अनुभूती गुरुवारी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने ( Tulja Bhavani Temple ) आणून दिली. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पुराने हजारो कुटुंबे उघड्यावर आलेली असताना लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडत तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या सुमारे २५ हजार साड्या पूरग्रस्त भगिनींसाठी पाठविण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. ( Tulja Bhavani rushed to the aid of flood-hit women; Temple Trust to send 25,000 sarees)
काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील पुराने हजारो कुटुंबे बाधित झाली. त्यांचे भरून न येणारे आर्थिक, मानसिक नुकसान झाले. अशा नागरिकांच्या मदतीला सरकारसोबतच सर्वसामान्यही जमेल ती मदत घेऊन धावून जात आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातही अनेक संस्था, संघटनांनी आपापल्या परीने अन्नधान्य, चादरी, कपडे अशी मदत पाठविली आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिकांना तर आवाहन केलेच, शिवाय तुळजाभवानीलाही साकडे घातले. यानंतर लागलीच मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेत विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी व अन्य सदस्यांशी चर्चा करून मंदिराच्या वतीने देवीला अर्पण करण्यात आलेल्या नव्या साड्या पूरग्रस्त भगिनींसाठी पाठविण्याबाबत चर्चा केली. कोणतेही आढेवेढे न घेता विश्वस्तांनी या निर्णयास सकारात्मकता दर्शविल्याने तब्बल २५ हजार साड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पाठविण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
या साड्यांमुळे मिळतेय लाखो रुपयांचे उत्पन्न
तुळजाभवानी देवीला भाविकांकडून सहावार व नऊवार साड्या वाहिल्या जातात. १० ऑगस्टपर्यंत मंदिर समितीकडे वाहिलेल्या साड्यांचा सुमारे २५ हजार स्टॉक आहे. यात १ हजार नऊवार, तर २४ हजार सहावार साड्या आहेत. नियमानुसार या साड्यांचा दरवर्षी लिलाव होत असतो. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मंदिराला मिळत असते. मात्र, यावेळी मदत म्हणून या साड्या पूरग्रस्तांना पाठविण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला आहे. लवकरच या साड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात येणार आहेत.