तुळजाभवानी मंदिरात आता वृद्ध, बालकांना प्रवेश बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:34 AM2021-02-24T04:34:05+5:302021-02-24T04:34:05+5:30
तुळजापूर : वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने नवीन नियमावली जाहीर केली आहे. यात बुधवारपासून १० वर्षाखालील व ...
तुळजापूर : वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने नवीन नियमावली जाहीर
केली आहे. यात बुधवारपासून १० वर्षाखालील व ६५ वर्षावरील व्यक्तींना मंदिरात प्रवेश बंदीसोबतच कुणी विनामास्क आढळून आल्यास त्यास हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे.
राज्यात व जिल्ह्यात कोराणाचा वाढता प्रभाव पाहून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कडक नियमावली लागू केली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी बुधवारपासून केली जाणार आहे. तुळजाभवानी मंदिर प्रवेशासाठी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ हा आदेश लागू केला असून, १० वर्षाखालील व ६५ वर्षाच्या पुढील व्यक्तींना मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच मंदिरात तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्याचे दिसल्यास, मद्यपान केलेले व्यक्ती आढळल्यास व विना मास्क व्यक्ती दिसल्यास १ हजार रुपये दंड लागू करण्यात आलेला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर भाविक व पुजाऱ्यांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करावे. महत्त्वाचे म्हणजे भाविकांनी फिजिकल डिस्टनचे काटेकोरपणे पालन करावे व मंदिरातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ॲक्सिस पासची मर्यादा १० हजार
बुधवारपासून ॲक्सिस पासची मर्यादा १० हजार करण्यात आली असून, पेड दर्शन पासची मर्यादा दोन हजार राहणार आहे. फ्री पासमध्ये ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही ॲक्सिस पासचा समावेश आहे. देवी भाविकांनी व पुजाऱ्यांनी कोविडच्या सर्व नियमांचे कडक पालन करून मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन व्यवस्थापक तहसीलदार सौदागर तांदळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.