तुळजाभवानी मंदिर उद्यापासून २२ तास खुले; म्हणून वाढवली दर्शन वेळ
By चेतनकुमार धनुरे | Published: October 12, 2023 02:04 PM2023-10-12T14:04:37+5:302023-10-12T14:06:33+5:30
रविवारी घटस्थापना होऊन तुळजाभवानीच्या नवरात्रास प्रारंभ होणार आहे.
चेतन धनुरे
तुळजापूर (जि.धाराशिव) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १३ ऑक्टोबरपासून तुळजाभवानी मंदिर हे भाविकासाठी २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. १३ व १४ ऑक्टोबर रोजी भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी अगदी परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. याअनुषंगाने दर्शन वेळ वाढवण्यात आली आहे.
रविवारी घटस्थापना होऊन तुळजाभवानीच्या नवरात्रास प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी येणाऱ्या भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने व्हावे, यासाठी देवीचे चरणतीर्थ रात्री एक वाजता होणार आहे. यानंतर भाविकांना देवीच्या दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. सिंहासन व पंचामृत अभिषेक पूजा सकाळी सहा ते दहा व सायंकाळी सात ते नऊ या वेळेत होणार आहेत. सायंकाळी साडेदहा वाजता प्रक्षाळ व शेजारती होऊन रात्री अकरा वाजता मंदिर बंद होईल. या नियोजनामुळे आता २२ तास दर्शनासाठी मिळणार आहेत.
विजयादशमीपासून तुळजाभवानीची पाच दिवसीय मंचकी श्रमनिद्रा सुरू होणार आहे. कोजागिरी पोर्णिमेनंतर २९ रोजी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर अश्विनी पोर्णिमेस सुरुवात होणार आहे. यामुळे २८ ते ३१ ऑक्टोबर या चार दिवसाच्या कालावधीत तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी पुन्हा २२ तास खुले ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर संस्थानने कळविले आहे.