तुळजाभवानी मंदिरात नोंदीपेक्षा सोने-चांदी, हिरे निघाले जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 06:56 AM2023-07-21T06:56:18+5:302023-07-21T06:57:35+5:30
गडबडीला वाव असल्याचा समितीचा निष्कर्ष ; तुळजाभवानी मंदिरातील मौल्यवान वस्तूंची मोजणी
लोकमत न्यूज नेटवर्क
धाराशिव : तुळजाभवानी देवीला भाविकांनी वाहिलेल्या मौल्यवान वस्तूंची मोजणी नुकतीच पूर्ण झाली आहे. यासाठी गठित समितीने दिलेल्या अहवालात सोने-चांदी मंदिराकडे असलेल्या नोंदीपेक्षा जास्तीचे आढळले आहे. यामुळे गडबडीला वाव असून, तब्बल ३५४ हिऱ्यांचीही नोंद निदर्शनास आली नसल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे.
श्री तुळजाभवानी देवीला भाविकांनी श्रद्धेपोटी अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांची मोजणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी एक समिती गठित केली होती. जवळपास महिनाभर चाललेल्या या मोजणीनंतर समितीने आपला अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार मंदिराकडे वाहिक सोन्यांच्या वस्तू, दागिन्यांचे वजन २४४ किलो ४४५ ग्रॅम इतके भरले आहे.
मंदिराकडे असलेल्या नोंदीपेक्षा हे वजन ७५६ ग्रॅम जास्त आहे. मोजणीअंती चांदीचे वजन हे ३९०८ किलो ३६८ ग्रॅम भरले आहे. यातही तफावत असून, नोंदीपेक्षा १७ किलो ८३ ग्रॅम वजन जास्तीचे आहे. तफावत आढळलेल्या वजनाच्या वस्तूंची नोंद का घेण्यात आली नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दुर्मीळ नाणीही नाहीत...
मोजणी समितीने पुरातन, शिवकालीन सुमारे ११ दागिने आढळून येत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याऐवजी इतर नोंद नसलेले १३ दागिने सापडले आहेत.
दुर्मीळ नाणीही गायब झाल्याने तुळजापूर ठाण्यात याविषयी सुमारे तीन-साडेतीन वर्षांपूर्वी गुन्हाही दाखल झाला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
डबी सापडली पण नोंद कुठे?
समितीला मौल्यवान वस्तूंची मोजणी करताना खजिना खोलीतील एका पेटीत डबी सापडली. त्यात १९ कॅरेटचे ३५४ हिरे आढळून आले. मात्र त्याची मंदिराकडे असलेली अधिकृत नोंद निदर्शनास आणून देण्यात आली नाही.
‘अलंकार गायब प्रकरण जुनेच’
अलंकार गायब असल्याचे प्रकरण जुनेच आहे. यात एक गुन्हाही दाखल झाला आहे. तरीही समितीला १९६३ ची देवीच्या अलंकारांची नोंद यादी पुरवून पुन्हा एकदा पडताळणी करून अहवाल देण्यास सांगितले आहे. यात तफावत आढळल्यास योग्य ती कायदेशीर कार्यवाही करता येईल, असे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले.