तुळजापूर ड्रग्स प्रकरण: माजी नगराध्यक्षांची गाडी जप्त, ड्रग्सच्या विळख्यात बहुपक्षीय कार्यकर्ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:38 IST2025-03-27T15:36:32+5:302025-03-27T15:38:50+5:30
व्याप्ती आणखी वाढली, पोलिसांनी न्यायालयासमोर नवीन १० आरोपींची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे फरार आरोपींची संख्या २१ वर जाऊन पोहोचली आहे.

तुळजापूर ड्रग्स प्रकरण: माजी नगराध्यक्षांची गाडी जप्त, ड्रग्सच्या विळख्यात बहुपक्षीय कार्यकर्ते
धाराशिव/तामलवाडी : तुळजापूर ड्रग्स प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे समोर आले आहे. याला राजकीय किनार देण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यात बहुपक्षीय कार्यकर्ते तथा समर्थक सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, तुळजापूरच्या फरार माजी नगराध्यक्षांची फॉर्च्युनर मध्यरात्री पोलिसांनी जप्त केली असून, एका आरोपीस ताब्यातही घेतले आहे.
तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणात मंगळवारी रात्री उशिरा तामलवाडी पोलिसांनी फरार आरोपी गजानन प्रदीप हंगरकर यास गजाआड केले आहे. त्यास न्यायालयाने बुधवारी १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच फरार आरोपी माजी नगराध्यक्ष बापू कणे यांची फाॅर्च्युनर कार त्यांच्या राहत्या घरासमोरून मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १४ आरोपी गजाआड झाले आहेत. पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपाधीक्षक नीलेश देशमुख यांनी तपासाला गती दिली असून, तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे प्रकरणाच्या तळाशी जाऊन तपास करीत आहेत. यामुळे या प्रकरणात बुधवारी आणखी १० नव्या आरोपींचा समावेश झाला आहे. पोलिसांनी न्यायालयासमोर नवीन १० आरोपींची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे फरार आरोपींची संख्या २१ वर जाऊन पोहोचली आहे.
हे आहेत नवे दहा आरोपी
विनायक इंगळे, श्याम भोसले, संदीप टोले, जगदीश पाटील, विशाल सोंजी, अभिजित अमृतराव, दुर्गेश पवार, रणजित पाटील, अर्जुन हजारे, नाना खुराडे (सर्व रा. तुळजापूर) या दहा नव्या आरोपींची नावे पोलिसांनी न्यायालयासमोर जाहीर केले आहेत.
राजकीय कार्यकर्तेही विळख्यात
ड्रग्स प्रकरणात फरार असलेले माजी नगराध्यक्ष बापू कणे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केल्याचे समोर आले आहे. सुमित शिंदे, राहुल कदम परमेश्वर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे समर्थक असल्याचे समोर आले आहे. माजी नगराध्यक्ष पती पिटू गंगणे हे भाजपशी संबंधित आहेत. नव्या नावातही काही पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक आहेत. यामुळे बहुपक्षीय कार्यकर्ते, समर्थक ड्रग्सच्या विळख्यात अडकल्याचे निष्पन्न झाले आहे.