वीस दिवसात कोरोनाला गावातून केले हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:16+5:302021-05-28T04:24:16+5:30
पॉझिटिव्ह स्टोरी संतोष मगर तामलवाडी : शहराबरोबर ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अनेक गावे रेड झोनमध्ये आले असून, ...
पॉझिटिव्ह स्टोरी
संतोष मगर
तामलवाडी : शहराबरोबर ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अनेक गावे रेड झोनमध्ये आले असून, या आजाराने अनेकांचा बळी घेतला. तालुक्यातील जळकोटवाडी गावातदेखील कोरोनाचा शिरकाव होऊन ११ बाधित आढळले होते. परंतु, ‘ब्रेक द चेन’साठी संपूर्ण गाव एकवटले अन् विविध उपाययोजना आखल्या. यामुळे अवघ्या २० दिवसात कोरोनाला गावाबाहेर हाकलण्यात ग्रामस्थांना यश आले. यानंतरही ग्रामस्थांकडून नियमांचे काटेकोर पालन होत असल्याने मागील महिनाभरात गावात एकही कोरोना बाधित आढळून आला नाही.
तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी हे बाराशे लोकवस्ती व दीडशे कुटुंबाचे गाव. स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्याने ग्रुप ग्रामपंचायत माध्यमातून गावाचा कारभार चालवला जातो. जिल्ह्यातील पहिले निर्मल भारत पुरस्कार विजेते अशी या गावाची ओळख आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावकऱ्यांनी एकजुटीने कोरोनाला वेशीवर रोखले. यामुळे वर्षभरात एकही रुग्ण आढळला नाही. गावच्या सीमा बंद करून उपाययोजना आखल्या. मात्र, दुसऱ्या लाटेत जळकोटवाडी गावात संसर्ग वाढल्याने आठ दिवसात ११ रुग्ण आढळून आले. त्यात चौघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे गावकऱ्याची चिंता वाढली. यासाठी ग्रामपंचायतने फवारणी करून निर्जंतुकीकरण करून घेतले. कुटुंबनिहाय मास्क, आर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप करून सरकारी नियमाचे पालन करण्यासाठी गाव एकवटले. अवघ्या २० दिवसात नियमाची कडक अंमलबजावणी करीत कोरोनाला गावाबाहेर घालविले. यानंतर मागील महिनाभरात जळकोटवाडी गावात एकही बाधित आढळला नाही. यासाठी सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. एस. एम. माशाळकर, सरपंच गणेश डोलारे, मंडळ अधिकारी बाळासाहेब जगताप, तलाठी अनिल काळे, ग्रामसेवक सुभाष चौगुले, आशा कार्यकर्ती रेश्मा फंड, अंगणवाडी कार्यकर्ती सावित्राबाई देशमुख, अनिता देशमुख, ग्रामपंचायतीचे शिपाई शहाजी कदम यांनी परिश्रम घेतले.
चौकट
जळकोटवाडी गावात दुसऱ्या लाटेत ११ रुग्ण आढळून आले होते. परंतु, तत्काळ उपाययोजना करून कोरोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करीत २० दिवस ‘ब्रेक द चेन’ मोहीम राबविली. गावात जंतुनाशकाची फवारणी केली. कोरोनाला गावाबाहेर काढणे शक्य झाले. यात गावकऱ्यांचीही चांगली साथ मिळाली.
- गणेश डोलारे,
सरपंच जळकोटवाडी
गावात रुग्ण आढळल्यानंतर तत्काळ कुटुंबनिहाय दीडशे कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिवाय, मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला. फिजिकल डिस्टन्सिंगबाबत गावकऱ्यात जनजागृती केल्याने आज गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही.
- रेश्मा फंड,
आशा कार्यकर्ती, जळकोटवाडी