वीस गावांना अजूनही टमटमचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:29+5:302021-06-25T04:23:29+5:30
उमरगा : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर एप्रिल महिन्यात एसटी बससेवा बंद करण्यात आली. यानंतर तब्बल दोन महिन्यांनी कोरोनाचा ...
उमरगा : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर एप्रिल महिन्यात एसटी बससेवा बंद करण्यात आली. यानंतर तब्बल दोन महिन्यांनी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर ७ जूनपासून बसगाड्या पुन्हा धावू लागल्या. सुरुवातीला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, आता प्रवासी संख्येत चांगली वाढ झाली असली, तरी तालुक्यातील वीस गावांतील ग्रामस्थांना अजूनही खासगी टमटमचा आधार घ्यावा लागत आहे. या आगारातील ३२२ पैकी अजूनही ६० फेऱ्या बंदच आहेत.
उमरगा आगारातील बससेवा ७ जूनपासून सुरू झाली. सुरुवातीला ५० टक्के बससेवा सुरू करण्यात आली होती. हळूहळू प्रवासी संख्या वाढल्यानंतर आता ७० ते ८० टक्के फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या ३२२ फेऱ्यांपैकी २६० मार्गावर फेऱ्या सुरू असून, पूर्ण क्षमतेने प्रवासीसंख्या नसल्याने कित्येक मार्गावर तोट्यात फेऱ्या चालू ठेवाव्या लागत आहेत. असे असले तरीही जिल्ह्यातील इतर आगारांपेक्षा उमरगा आगाराचे उत्पन्न चांगले आहे. अद्यापही कोरेगाव, गुगळगाव, माडज, वागदरी, नाईचाकूर, त्रिकोळी, कलदेव निंबाळा, काळानिंबाळा, समुद्राळ, नागूर, जेवळी, नारंगवाडी, पेठसांगवी, होळी, माकणी, सास्तूर, लोहारा आदी २० गावांतील मार्गावर बससेवा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना खासगी टमटमचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या उमरगा आगारात लांब पल्ल्याच्या मुंबई, भिवंडी, बोरीवलीसाठी चार गाड्या, पुणे दहा, औरंगाबाद दोन व नांदेड दोन अशा १९ गाड्या फेऱ्या करीत असून, ग्रामीण भागातील १३ मार्गावर फेऱ्या चालू आहेत. एकूण २४ हजार ८४२ किमी प्रवास या गाड्या करीत असून, १२ हजार प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत. येणाऱ्या काळात ग्रामीण व लांब पल्ल्याच्या गाड्या मागणीनुसार चालू करण्यात येणार असल्याचे आगारप्रमुख प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.
=====
या गावांना बससेवा कधी सुरू होणार..
तालुक्यातील कोरेगाव, गुगळगाव, माडज,
वागदरी, नाईचाकूर, त्रिकोळी, कलदेव निंबाळा, काळानिंबाळा, समुद्राळ, नागूर, जेवळी, नारंगवाडी, पेठसांगवी, होळी, माकणी, सास्तूर यासह जवळपास २० गावांत अद्याप बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे तालुक्याच्या व इतर गावांना जाण्यासाठी खासगी टमटम, काळी-पिवळी या वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. वेळेवर वाहन मिळत नसल्याने लवकरात लवकर बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
आमचे नाईचाकूर गाव उमरगा शहरापासून जवळपास १५ किमी अंतरावर आहे. महत्त्वाची कामे, दवाखाना, शेती, कोर्ट-कचेरी, खरेदीसाठी आम्हा गावकऱ्यांना उमरगा येथे दररोज जावे लागते. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून, आमच्या रोजच्या पाच फेऱ्याची गाडी सुरू करावी. बस नसल्याने नाईलाजास्तव आम्हाला जादा भाडे देऊन खासगी गाडीने शहर गाठावे लागत आहे.
- सिद्धू माने, नाईचाकूर
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून आमच्या गावची बससेवा बंद आहे. त्यामुळे आम्हाला खासगी टमटमने प्रवास करावा लागत आहे. अत्यावश्यकवेळी तर अव्वाच्या सव्वा भाडे द्यावे लागते. त्यामुळे उमरगा आगाराने आमच्या मार्गावरील बससेवा तात्काळ सुरू करून गैरसोय दूर करावी.
- अमित राठोड, होळी
=========
एकूण बसेस ७४
सध्या सुरू असलेल्या बसेस ६६
आगारात उभ्या असलेल्या ८
एकूण कर्मचारी ४१७
एकूण चालक १६४
एकूण वाहक १७५
सध्या कामावर चालक १६४
सध्या कामावर वाहक १७५
फोटो-बस आगारात कमी फेऱ्या असल्याने थांबून असलेल्या बसेस व कायम गजबज असलेल्या बसस्थानकात प्रवाशांची तुरळक गर्दी.