चाकूने वार करत घरातून लुटले पावणेदोन लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:56+5:302021-07-15T04:22:56+5:30
वाशी शहरातील नवीन बसस्थानकालगत असलेल्या बायपास रोडवर सोैदागर जगताप यांचे घर आहे. १३ जुलैला रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपी ...
वाशी शहरातील नवीन बसस्थानकालगत असलेल्या बायपास रोडवर सोैदागर जगताप यांचे घर आहे. १३ जुलैला रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले तेव्हा १४ जुलैला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घराचे पाठीमागील दाराचा कोयंडा उचकटून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ सौदागर व त्यांची पत्नी स्वाती यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला असता स्वाती यांना चोरट्यांची चाहूल लागली़ त्यांनी सौदागर यांना उठविले असता चोरट्यांनी चाकूने त्यांच्या नाकावर वार केला़ यावर सौदागर यांनी काय घेऊन जायचे ते घेऊन जा, मात्र मारू नका, असे म्हटल्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे १ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे दागिने व रोख १३ हजार, असा एकूण १ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला़
चोरट्यांनी पलायन करताच सौदागर यांनी घटनेची माहिती मोबाईलवरून नातेवाईकांना कळविली. अवघ्या १० मिनिटांच्या आत पोलीस व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला होता़ सहायक निरीक्षक अशोक चवरे यांनी तत्काळ घटनास्थळास भेट देत पाहणी करून घटनेची माहिती वरिष्ठांना दिली़ त्यानंतर भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ़ विशाल खांबे, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह श्वानपथक व ठसेतज्ज्ञ सकाळी दाखल झाले़ त्यांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दुपारी याप्रकरणी स्वाती सौदागर जगताप यांच्या फिर्यादीवतून वाशी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशीत गेल्या महिन्याभरापासून चोऱ्या वाढल्या आहेत. विशेषत: रामनगर, तपोवन रोड, महाविद्यालय रोडलगत घटना घडत आहेत. त्यामुळे शहरात गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.