दोनशेजणांनी घेतला लसीचा दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:01+5:302021-07-14T04:38:01+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मंगळवारी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मोठी ...
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मंगळवारी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दोनशे नागरिकांना ही लस टोचण्यात आली.
कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी मंगळवारी लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एस. माशाळकर, डॉ. शुभांगी जळकोटे, डॉ. स्वाती बारस्कर, सरपंच मंगलताई गवळी, उपसरपंच हमीद पठाण, आरोग्य सेविका यू. बी. काळे, संगीता चव्हाण, अरोग्य सेवक प्रदीप शिंदे, एच. ए .चौधरी, आशा कार्यकर्ती, अनिता लोखंडे, साविता रणसुरे, चंद्रकला रणसुरे, सपना शिंदे, जामाबाई करंडे आदींनी परिश्रम घेतले.
सांगवीला शिबिर घेण्यास नकार
सांगवी (काटी) ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच ललिता मगर, उपसरपंच मिलिंद मगर यांनी एप्रिल महिन्यात गावात शिबिर घेण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले होते. आरोग्य विभागाने तब्बल दोन महिन्यांनंतर याची दखल घेत ‘शिबिराची बाब राज्य सरकारच्या अधीन आहे. त्यामुळे तूर्तास येथील नागरिकांनी माळुंबा, सावरगाव येथे जाऊन लस टोचून घ्यावी’, असे कळविले आहे. दरम्यान, बाहेरगावी जाण्यास वाहतुकीची सोय नसल्याने येथील नागरिक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.