उस्मानाबादमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून गोळीबार, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 09:26 AM2021-05-02T09:26:13+5:302021-05-02T09:27:15+5:30
Crime news osmanabad अपूर्ण आर्थिक व्यवहारातून केला गोळीबार
समुद्रवाणी/उस्मानाबाद : आर्थिक देवाणघेवाणीतून एकाने टाकळी येथे गोळीबार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेत दोघेजण जखमी झाले असून, याप्रकरणी रविवारी पहाटे बेंबळी ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळी (जि. उस्मानाबाद) येथील अनिल राम सूर्यवंशी या तरुणाने ५ वर्षांपूर्वी गावातीलच दीपक धनाजी जगताप यास दुचाकीची विक्री केली होती. त्यापोटी दीपक हा अनिलचे १५ हजार रुपये देणे होता. मात्र, दुचाकी घेतल्यानंतर दीपक हा कुटुंबासह पुण्याला रहावयास निघून आला. चार दिवसांपूर्वी तो गावात परत आल्याचे समजल्यानंतर अनिलने दिपकला भेटून पैसे मागितले. तेथे किरकोळ वाद झाल्यानंतर हे पैसे १ मे रोजी देण्याचे ठरले होते.
त्यामुळे अनिल हा आपल्या मित्रांसह गावातील समाजमंदिरामागे थांबला होता. तेव्हा आरोपी दीपक जगताप हा त्याच्या अन्य तीन मित्रांसह दोन दुचाकीवरून तेथे आला व मला पैसे मागतो का, अशी विचारणा करीत कमरेला अडकवलेली बंदूक काढून ती अनिलच्या डोक्यावर लावली. यावेळी त्याचे साथीदार गोळी झाडण्यासाठी चिथावणी देत होते. तेव्हा अनिलने दिपकच्या हातात हिसका दिला. या झटापटीत आरोपी दिपकने खाली फरशीवर गोळी झाडली. ती उडून अनिलच्या मित्र राजदीप व सचिन जगताप यांना लागली.
यात राजदीपच्या पोटाला गंभीर जखम झाली असून, सचिनच्याही छातीला गोळी चाटून गेली. या प्रकारानंतर गावकरी जमा होत असल्याने आरोपीडिपाक जगताप व त्याचे इतर तीन साथीदार गोळीची रिकामी पुगळी घेऊन तेथून पळाले. घटनेची माहिती मिळताच बेंबळी ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक एस. एस. घायाळ व कर्मचारी पी.एम. आलुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले नाहीत. यावेळी उपअधीक्षक मोतीचंद राठोड यांनीही भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. रात्री उशिरा याप्रकरणी अनिल सूर्यवंशी याचा जबाब नोंदवून पहाटे चार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.