दोन महिन्यानंतर मैदाने पुन्हा गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:22+5:302021-06-09T04:40:22+5:30
उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्वामुळे शासनाने २ महिन्यापूर्वी काही कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, ५ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी ...
उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्वामुळे शासनाने २ महिन्यापूर्वी काही कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, ५ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढत सकाळी ५ ते ९ दरम्यान क्रीडा संकुल, मैदाने, मॉर्निंग वॉक, सायकलिंग, जिम चालू करण्यास परवानगी दिली असून, यामुळे मागील दोन महिन्यांपासून ओस पडलेली मैदाने पुन्हा गजबजत असल्याचे चित्र आहे.
गतवर्षी कोरोनामुळे बंद झालेले सर्व क्रीडाक्षेत्र या जानेवारी - फेब्रुवारीपासून हळूहळू सुरू होतानाचे चित्र होते. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने राज्य शासनाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही कडक निर्बंध आणि नियम लागू केले. याचा फटका जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला देखील बसला. क्रीडांगणे, मैदाने यासह विविध खेळ, प्रशिक्षण केंद्र बंद झाल्यामुळे खेळाडू प्रशिक्षकांवर पुन्हा संकट येणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. गतवर्षाच्या संकटाला तोंड देत कसेतरी उभे राहिलेले प्रशिक्षक पुन्हा डगमगले होते. जिल्हातील खो-खो, धनुर्विद्या, क्रिकेट, फूटबॉल, हॉकी, कबड्डी, हॉलीबॉल व अन्य मैदानी खेळ तर स्केटिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन, ज्युडो, कुस्ती व योग यांच्यासह इतर खेळावर संकट उभे राहिल्याची परिस्थिती होती.
दरम्यान, मागील काही दिवसांत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ५ जून रोजी नवे आदेश काढत नियमाच्या अधीन राहत मैदाने खुली करण्यास परवानगी दिली. यामुळे खेळाडू प्रशिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
कोट........कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे क्रीडा प्रशिक्षकांसाठी अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातून कसेबसे ते सावरत असतानाच पुन्हा संसर्ग वाढल्याने नवे निर्बंध लावण्यात आले. यामुळे प्रशिक्षकांसह त्यांचे कुटुंबही डगमगले होते. याबाबतीत फेरविचार करण्याची आम्ही मागणी केली होती. आता जिल्हाधिकाऱ्यांनी मैदाने चालू करण्यासाठी दिलेल्या परवानगीमुळे काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
- नितीन जामगे, धनुर्विद्या प्रशिक्षक.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे प्रशिक्षक, खेळाडूंमध्ये नवचैतन्य आले असून, नव्या दमाने खेळाडू पुन्हा सरावासाठी मैदानात उतरले आहेत. यातूनच खेळाडूंची स्पर्धेतील कामगिरी सुधारण्यास मदत होईल.
- प्रज्योत कावरे, राष्ट्रीय इनलाईन हॉकी खेळाडू
खेळाडूंच्या विकासासह त्यांचा खेळ विकसित होण्याच्या दृष्टीने क्रीडा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. या निर्णयाप्रमाणे शासनाने विविध खेळांच्या विविध स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी देणे महत्वाचे आहे.
- प्रताप राठोड, क्रीडा संघटक