कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ५ वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 07:41 PM2021-05-08T19:41:33+5:302021-05-08T19:41:54+5:30
डोकेवाडी येथील शाहू दादाराव आहेर यांनी २३ ऑक्टोबर २०१२ रोजी वाशी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली होती.
भूम (जि.उस्मानाबाद) : कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी भूमचे अतिरिक्त सत्र न्या. आर.व्ही उत्पात यांनी सुनावली. ही घटना सुमारे साडेआठ वर्षांपूर्वी डोकेवाडी येथे घडली होती.
डोकेवाडी येथील शाहू दादाराव आहेर यांनी २३ ऑक्टोबर २०१२ रोजी वाशी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली होती. गावातीलच अशोक चांगदेव पवार व अविनाश चांगदेव पवार यांनी आण्णासाहेब तुकाराम आहेर यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने वार केले. यात आण्णासाहेब गंभीर जखमी झाले होते. या तक्रारीवरून दोन्ही आरोपींवर वाशी ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरीक्षक ए. डी. दराडे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.
जखमी साक्षीदार आण्णासाहेब यांची साक्ष जास्त महत्त्वाची ठरली. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सहा. सरकारी अभियोक्ता किरण कोळपे यांनी केलेला युक्तिवाद, साक्षी, पुरावे ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्या. आर. व्ही. उत्पात यांनी शुक्रवारी दोन्ही आरोपींना कलम ३०७, ३२३ सह ३४ अन्वये दोषी धरत ५ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून बाजीराव बळे यांनी काम पाहिले.