तुळजापूर तालुक्यात कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या दोन महिलांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 03:18 PM2018-09-26T15:18:29+5:302018-09-26T15:31:49+5:30
कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या दोन महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु़) शिवारात घडली.
उस्मानाबाद : कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या दोन महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु़) शिवारात घडली. मयत महिला या सख्या जाऊ होत़
पिंपळा (बु़) येथील स्वप्नाली गणेश पाटील (वय-२५) व वैष्णवी उमेश पाटील (वय-२०) या दोन सख्या जावा आज सकाळी स्वत:च्या शेतातील बंधाऱ्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या़ बंधाऱ्यात १७ फूट पाणी होते़ कपडे धुत असताना एका महिलेचा पाय घसरून पाण्यात पडली़ तिला वाचविण्यासाठी दुसरीने पाण्यात उडी घेतली़ मात्र, यात दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ शेजारील एका महिलेच्या लक्षात ही बाब आल्यानंतर तिने ही माहिती ग्रामस्थांना सांगितली.
ग्रामस्थ येईपर्यंत दोघींचा बुडून मृत्यू झाला होता़ स्वप्नाली पाटील यांच्या पश्चात पती, सासू-सासरे, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़ वैैष्णवी उमेश पाटील यांचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते़ त्यांच्या पश्चात पती, सासू-सासरे असा परिवार आहे़ घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती़ याबाबत मयताचे चुलत सासरे भिवा मुरलीधर पाटील (रा़पिंपळा बु़) यांनी दिलेल्या माहितीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ सपोनि अशोक चौरे, धनाजी वाघमारे, महावरकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला़ पार्थिवाचे शवविच्छेदन काटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले़
शाळाही धोकादायक
पिंपळा (बु़) येथील गावच्या शिवारातील ओढे, नाल्यांचे खोलीकरण झाले आहे़ या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आहे़ या नाल्याजवळ जिल्हा परिषद शाळा असून, विद्यार्थीही नाल्याकडे जाण्याचा धोका आहे़ त्यामुळे शाळेला सुरक्षा भिंत बांधण्यासह शाळा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे़