ठाकरेंचं ठरलं, ओम राजेनिंबाळकर पुन्हा लोकसभा रिंगणार; महायुतीचा सस्पेन्स कायम
By चेतनकुमार धनुरे | Published: March 27, 2024 04:00 PM2024-03-27T16:00:24+5:302024-03-27T16:02:57+5:30
शिवसेनेचे (ठाकरे) खा.ओम राजेनिंबाळकर यांची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या धाराशिव दौऱ्यात जाहीर केली होती.
धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीकडून शिवसेनेचे (ठाकरे) विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा बुधवारी झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व जनतेने दर्शविलेला विश्वास यापुढेही कायम राखू, अशी प्रतिक्रिया खा.राजेनिंबाळकर यांनी दिली. दुसरीकडे महायुतीच्या उमेदवाराबाबत मात्र अजूनही सस्पेन्स कायम आहे.
शिवसेनेचे (ठाकरे) खा.ओम राजेनिंबाळकर यांची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या धाराशिव दौऱ्यात जाहीर केली होती. बुधवारी त्याची औपचारिक घोषणा झाली. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर ओम राजेनिंबाळकर म्हणाले, आपण निवडून आल्यानंतर पूर्णवेळ नागरिकांसाठी दिलेला आहे. मी जनतेशी सातत्याने संपर्कात असतो. आतातर विरोधकांनीही हे मान्य केले आहे. त्यामुळे विरोधक कामे काय केली हे सांगा म्हणताहेत.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF
त्यांना मी सांगू इच्छितो, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना धाराशिवला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळाले. कृष्णा मराठवाडा योजनेतील कामे प्रधान्यक्रमात घेण्याचे काम याच काळात करुन घेतले. विजेची समस्या सोडविण्यासाठी १३०३ कोटींचा आराखडा मंजूर करुन घेतला. दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन घेतले. तुळजापूर रेल्वेमार्गाचा सातत्याने पाठपुरावा करुन प्रक्रिया सुरु करुन घेतली. आता निविदाही निघाल्या आहेत. मागची पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केले आहे, त्याची पावती जनता मला देईल, असा विश्वास असल्याचे खा.राजेनिंबाळकर यांनी सांगितले. दरम्यान, महायुतीत ही जागा सोडवून घेण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. शिवाय, इच्छुकांची संख्याही अधिक असल्याने अजूनही उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे.