वाढत्या गुन्हेगारीविरोधात उमरगावासियांत रोष; पोलीस ठाण्यावर मूकमोर्चा काढून ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 16:48 IST2025-04-21T16:48:03+5:302025-04-21T16:48:25+5:30
बांधकाम गुत्तेदाराच्या हल्ल्याचा तपास उमरगा पोलिसांकडे नको; मुकमोर्चातून मागणी

वाढत्या गुन्हेगारीविरोधात उमरगावासियांत रोष; पोलीस ठाण्यावर मूकमोर्चा काढून ठिय्या
उमरगा ( धाराशिव ) : बांधकाम गुत्तेदारावरील हल्ल्याचा तपास उमरगा पोलिसांकडून काढून इतर यंत्रणा मार्फत करण्यात यावा, मुख्य सूत्रधारास अटक करण्यात यावी, तसेच शहरातील वाढत्या गुन्हेगारीस पायबंद घालण्यात यावा या मागणीसाठी वडार समाज बांधव तसेच उमरगा शहरवासियांनी आज पोलीस ठाण्यावर मुकमोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
शहरात १५ एप्रिल रोजी चार मारेकऱ्यांनी बांधकाम गुत्तेदार गोविंद दंडगुले यांच्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यांच्यावर सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या हल्ल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर नाराजगी व्यक्त करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, याप्रकरणाचा तपास उमरगा पोलिसांकडून काढून इतर यंत्रणेकडे द्यावा, वाढत्या गुन्हेगारीस लगाम घालावा, अशी मागणी करत वडार समाज बांधव तसेच उमरगा शहरवासियांनी आज मूकमोर्चा काढून पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. यावेळी जखमी गोविंद दंडगुले यांच्या मुलींच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चात ठाकरे सेनेचे आमदार प्रवीण स्वामी, शिंदे सेनेचे मा.आ. ज्ञानराज चौगुले, भाजपचे कैलास शिंदे, काँग्रेसचे विजय वाघमारे, वंचितचे राम गायकवाड, रिपाईचे हरीश डावरे, सामाजिक कार्यकर्ते शाहूराज माने, सकल मराठा समाजाचे शांतकुमार मोरे, युवासेनेचे किरण गायकवाड, युवानेते डॉ. अजिंक्य पाटील यांच्यासह विविध संघटना, पक्षांचे नेते, पदाधिकारी, वडार समाज बांधव, नागरिकांचा सहभाग होता.
ठिय्या आंदोलनात जखमी गोविंद दंडगुले यांची मुलगी आणि, मेहुणे तानाजी विजापूरे यांनी उमरगा पोलिसांनी चुकीचा तपास केल्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणी कोणाच्या तरी सांगण्यावरून मूळ आरोपी सोडून इतरांवरच गुन्हा नोंद केला असल्याचा दावाही त्यांनी केला.
तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे यावेळी मोर्चा समोर जाहीर केले. तसेच नातेवाईकांच्या जबाबावरून तपास करण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट केले.