भूम तालुक्यात हुमणीच्या आक्रमणाने ३ हजार हेक्टरवरील ऊस धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 04:53 PM2018-09-26T16:53:25+5:302018-09-26T16:54:17+5:30
अत्यल्प पावसामुळे उसाची वाढ खुंटली आसतानाच बदलत्या हवामानामुळे उसावर हुमणीने आक्रमण केले आहे.
भूम (उस्मानाबाद ) : अत्यल्प पावसामुळे उसाची वाढ खुंटली आसतानाच बदलत्या हवामानामुळे उसावर हुमणीने आक्रमण केले आहे. त्यामुळे तालुक्यातील सुमारे तीन हजार हेक्टवरील ऊस धोक्यात आला आहे.
मागील दोन वर्षांत झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी पुन्हा उसाच्या पिकाकडे वळले आहेत. भूम तालुक्यात तीन टप्प्यात सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील असा एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे उसाची वाढ खुंटली आहे. असे असतानाच उसाच्या पिकावर लोकरी मावाआणि हुमणी या किडीने आक्रमण केले आहे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे उभा ऊस करपून जात आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
फवारणी करूनही उपयोग नाही
३५ एक्कर क्षेत्रावर उसाची लागवड केली आहे. पाण्याअभावी उसाची वाढ खुंटली आहे. असे असतानाच आता हमुणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे ऊस पिवळा पडून करपून जात आहे. फवारणी करूनही त्याचा फारसा परिणाम होत नाही, असे शेतकरी बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
हवानाम बदलाचा फटका
बदलत्या हवामानाचा फटका ऊस पिकाला बसत आहे. हुमणीसारखी किड नियंत्रणात आणण्यासाठी पाटाद्वारे उसाला पाणी देताना फिप्रानिल हे किटकनाशक सरीमध्ये टाकावे, असे आवाहन कृषी अधिकारी संजीवण दराडे यांनी केले.