दुर्दैवी ! देवगाव येथे पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 06:56 PM2017-12-15T18:56:33+5:302017-12-15T18:57:39+5:30
वडिलासोबत पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका अकरा वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना परंडा तालुक्यातील देवगाव येथे आज सकाळी घडली.
उस्मानाबाद : वडिलासोबत पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका अकरा वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना परंडा तालुक्यातील देवगाव येथे आज सकाळी घडली.
देवगाव ( खु ) येथिल सतीश पाटील हे कुटुंबासह देवगाव शिवारातील वस्तीवर राहतात. आज सकाळी सतीश यांची अकरा वर्षीय मुलगी ईश्वरी कळशी त्यांच्या सोबत पाणी आणण्यासाठी वस्तीला लागूनच असलेल्या उल्फा नदीवर गेली होती. घागर भरून घेवून सतीश निघाले असता, ईश्वरी नदीकाठच्या दगडावर बसून कळसीमध्ये पाणी भरत होती. यावेळी पायाखालचा दगड खचल्याने ईश्वरीचा तोल जावून ती आठ ते दहा फुट खोल पाण्यात पडली.
या दरम्यान, सतीश घागर घेवून दूरवर गेले होते. खूप वेळापासून मुलीचा काहीच अवाज येत नसल्याने सतीश पाटील यांनी मागे वळून पाहिले असता ईश्वरी दिसून आली नाही. त्यामुळे पाटील यांनी नदीकडे धाव घेतली असता मुलगी पाण्यात पडल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बाजुलाच शेतावर असलेले महादेव नरसाळे, संभाजी पाटील, हरी पाटील यांनी धाव घेवून पाण्यात उड्या मारून ईश्वरीचा शोध घेतला. संभाजी यांनी ईश्वरीला बाहेर काढून उपचारासाठी तातडीने परंडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी ईश्वरीला मयत घोषित केले. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. शहाजी नरसाळे यांनी दिलेल्या माहितीवरून परंडा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ काझी हे करीत आहेत. ईश्वरी देवगाव (खु.) येथील जिल्हा परिषद शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत होती.