राज्यावर अभूतपूर्व संकट, हे नुकसान लवकर भरून न येणारे : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 11:53 AM2020-10-19T11:53:16+5:302020-10-19T11:58:35+5:30
Sharad Pawar Visit Usmanabad राज्यावर आलेल्या या अभूतपूर्व संकटाच्या स्थितीत केंद्राच्या मदतीची गरज आहे
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : अतिवृष्टीने राज्यावर अभूतपूर्व संकट आले आहे. यामध्ये झालेले नुकसान हे केवळ एक हंगामाचे, वर्षाचे नाही तर त्याच्या दुरुस्तीला अनेक वर्षे जातील. सध्या राज्य ऐतिहासिक आर्थिक संकटात आहे. तरीही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी नवे कर्ज काढता येईल, असे प्रतिपादन खा. शरद पवार यांनी तुळजापूर येथे सोमवारी केले.
उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, राज्यावर आलेल्या या अभूतपूर्व संकटाच्या स्थितीत केंद्राच्या मदतीची गरज आहे, एकट्या राज्याला हे पेलणारे नाही. यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. तेव्हा पिकविम्याच्या निकषात, धोरणात अशा आपत्कालीन स्थितीसाठी शिथिलता हवी, हे केंद्राच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे पवार म्हणाले.
भविष्यात शेतमाल खरेदीत एकाधिकारशाही सुरू होईल.
दरम्यान, केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या कृषी विधेयकावरही टिप्पणी करीत त्यातील धोका सांगितला. शेतमाल खरेदीत मोठ्या जागतिक कंपन्या उतरतील, आता चांगला भाव देतीलही. पण एकदा येथील व्यापारी संपले की मग ते म्हणतील त्या दराने माल द्यावा लागेल. एकाधिकारशाही सुरू होईल.
पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण परत येऊ इच्छित आहेत. https://t.co/9eXpYHENTw
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 19, 2020
खडसे यांनी त्यांच्या पक्षासाठी मोठे कष्ट घेतलेत
एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पक्षासाठी मोठे कष्ट घेतलेत, विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या, याची नोंद पक्ष घेत नाही, असे त्यांना वाटत असेल. दुसरा पक्ष त्याची नोंद घेतो असेही त्यांना वाटत असेल, इतकेच बोलून खडसेंच्या पक्षांतरावरील वावड्यावर त्यांनी पूर्ण भाष्य करणे टाळले.
मुख्यमंत्री एका ठिकाणी बसून नियोजन करतात
राज्यपालानी स्वतःच्या पदाची व मुख्यमंत्री पदाची किंमत ठेवावी. केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांची कानउघाडणी केलीय. यानंतरही पदावर राहावे वाटत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे, अशी अप्रत्यक्ष टीका पवारांनी केली. मुख्यमंत्रीही पाहणी दौऱ्यावर येत आहेत. ते बाहेर पडत नाहीत असे नाही, आम्हीच त्यांना सांगितलंय एका ठिकाणी बसून नियोजन करायला, असे सांगत ठाकरे यांची पाठराखण केली.