स्थानकात लालपरीचालकांची बेशिस्त, प्रवाशांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:35 AM2021-08-27T04:35:26+5:302021-08-27T04:35:26+5:30
तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकात काही बसचालक गाड्या फलाटावर न उभ्या करता चक्क फलाटाच्या आडव्या उभ्या करत ...
तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकात काही बसचालक गाड्या फलाटावर न उभ्या करता चक्क फलाटाच्या आडव्या उभ्या करत असल्याने प्रवाशांचा गोंधळ होत आहे. काही वेळा बसेस एकमेकांच्या आडव्या उभ्या राहत असल्याने प्रवाशांची भरती होऊन बसची सुटण्याची वेळ झाली तरी समोरची बस निघाल्याशिवाय मागची बस काढता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते.
तुळजापूर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने राज्यासह परराज्यातील भाविक प्रवाशांचे एसटीला मोठी गर्दी असते. सध्या नागपंचमी, राखी पौर्णिमा सणाला माहेरला आलेल्या लेकींचा परतीचा प्रवास सुरू असल्याने येथील बस्थानक प्रवाशांनी गजबजून गेले आहे. तुळजापूर आगाराच्या बसच्या दररोज २३५ तर इतर आगाराच्या बसच्या २५० फेऱ्या हॊतात. दररोज या जुन्या बसस्थानकातून हजारो प्रवासी बसमधून प्रवास करतात. मात्र, काही बसचालक गाड्या अस्ताव्यस्त उभ्या करीत असल्याने प्रवाशांना बस शोधणे जिकिरीचे होत आहे. बस फलाटासमोर उभी न करता आडव्या उभा केल्या जात असल्याने बस शोधणाऱ्या प्रवाशांची अन् बसमधून चढ-उतार करणाऱ्या प्रवाशांची गर्दी होती. याचा सर्वाधिक त्रास वयोवृध्द प्रवाशांना होत आहे.
दरम्यान, आता कोरोनाही हळूहळू ओसरू लागला असून, आज ना उद्या मंदिरदेखील प्रवाशांसाठी खुले होईल. यानंतर भाविकांच्या संख्येत वाढ होणार आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यास एसटी बसही वाढवाव्या लागणार आहेत. त्यावेळीही अशीच परिस्थिती राहिल्यास बसस्थानकात एसटी बसची कोंडी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे याकडे आताच महामंडळ प्रशासनाने लक्ष देऊन शिस्त लावणे गरजेचे आहे.
मी दररोज बसमधून प्रवास करतो. विशेषतः जुन्या बसस्थानकाशी माझा जास्त संबंध येतो. येथे प्रत्येक वेळी बसचालक बस अस्ताव्यस्त उभा करून एन्ट्रीसाठी बसस्थानकात जातात. याचा परिणाम वयोवृद्ध नागरिकांवर जास्त होतो. त्यांना कुठे बस लागते हे शोधत बसावे लागते. बस न सापडल्याने अचानक गाड्याही निघून जातात.
- बालाजी वाघमारे, प्रवासी
काही बसचालक बसस्थानकात आणल्यानंतर ठरावीक फलाटावर उभी न करता बस्थानकात अस्ताव्यस्त उभी करतात. यामुळे प्रवाशांना बस शोधताना तर त्रास होतोच. शिवाय, काही वेळा बसमध्ये चढणेसुद्धा जिकिरीचे होऊन जाते. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन बसचालकांना योग्य सूचना देण्याची गरज आहे.
- ॲड. सिद्धार्थ ढाले, प्रवासी
जुन्या बसस्थानकामध्ये जागा अपुरी असल्याने सोलापूर मार्गावरील गाडी सरळ उभी ठाकली तर उस्मानाबाद मार्गावरील बसला फलाटावर येता येत नाही, अशी परिस्थिती आहे. लातूरकडील गाड्या फलाटावर लागत नाहीत. त्यांनाही पत्र दिले आहे. बाकी आपल्या सगळ्या गाड्या योग्य फलाटावर लागतात. तसेच त्या ठिकाणी एक कंट्रोलर दिला असून, शिस्त लावण्यात येईल.
- राजकुमार दिवटे, आगार प्रमुख
260821\20210826_110841.jpg
बस्थानकात बेशिस्त उभा असलेला बस