घाण पाण्यातून बसमध्ये चढ-उतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:34 AM2021-08-26T04:34:57+5:302021-08-26T04:34:57+5:30
तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील जुन्या बसस्थानक परिसराची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. परिसरातील डांबरीकरण गेली चार ते पाच ...
तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील जुन्या बसस्थानक परिसराची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. परिसरातील डांबरीकरण गेली चार ते पाच वर्षांपासून उखडलेले असून, याकडे दुर्लक्ष झाल्याने पावसाळ्यात भाविक, प्रवाशांना खड्ड्यात साचणाऱ्या घाण पाण्यातून बसमध्ये चढ-उतार करावी लागत आहे.
तालुक्यात साखर कारखाना, विविध इंडस्ट्री, शाळा, महाविद्यालय, नळदुर्ग येथील किल्ला, खंडोबा मंदिर यासोबतच महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी एक पूर्णपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर तुळजापुरात असल्याने येथे महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकांची वर्दळ असते. महामंडळाला चांगले उत्पन्न देणारी येथील दोन्ही बसस्थानके असताना जुन्या बसस्थानकातील उखडलेले डांबरीकरण व खड्डे मात्र भाविकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. खड्डे चुकवून बस चालविण्याची कसरत चालकांना करावी लागत असून, खड्डे आणि चिखल सांभाळत बस शोधण्याची कसरत प्रवासी, भाविकांना करावी लागते.
कोट......
दररोज मी उस्मानाबाद-तुळजापूर बसने प्रवास करतो. तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकात खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घाण पाण्यातूनच बसमध्ये चढ-उतार करावी लागते. उन्हाळ्यात धुळीचे लोळ उडतात. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागत असतानाही परिसराचे डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
- सिध्दार्थ बनसोडे, प्रवासी
जुने बस्थानक व डेपोमधील डांबरीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली आहे. परंतु, ते काम निधीमुळे थांबले आहे.
- राजकुमार दिवटे, आगार प्रमुख
250821\20210824_102338.jpg
जुन्या बस्थानकाला आले तळ्याचे स्वरूप....प्रवाशाना मारावे लागतात चक्क उड्या