UPSC Results : पाच वेळा अपयशी ठरला, पण जिद्दीनं यशोशिखर चढला; मेकॅनिकच्या मुलानं 'जिंकून दाखवलं'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 06:42 PM2020-08-04T18:42:18+5:302020-08-04T18:45:04+5:30
गेल्या सहा वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असित हे मागील एक वर्षापासून दिल्ली येथील आंबेडकरवादी मिशन येथे नागरी सेवेसाठी अभ्यास करीत होते.
उमरगा (जि़उस्मानाबाद) : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत एकूरगा येथील असित नामदेव कांबळे यांनी देशात ६५१ वा रँक मिळविला आहे. यावर्षीच मार्च महिन्यात त्यांनी भारतीय वनसेवा परीक्षेत देशात ६६ वा क्रमांक पटकाविला होता. वडील एसटीत मेकॅनिक असले तरी त्यांनी दिलेल्या पाठबळावर जिद्दीने असितने हे शिखर सर करुन दाखविले आहे़
असित यांचे माध्यमिकपर्यंतचे शिक्षण एकूरगा गावीच झाले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण अहमदपूर येथे तर अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी पुण्यात पूर्ण केले़ त्यांचे वडील नामदेव कांबळे हे राज्य परिवहन महामंडळ उमरगा येथे मेकॅनिक म्हणून कार्यरत होते़ ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. आई ललिता कांबळे अंगणवाडी सेविका आहेत़ प्रतिकूल परिस्थिती असतानाही मुलगा हुशार असल्याने त्यांनी असितच्या पंखात बळ भरले़ त्यांनी मुलाच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ दिली नाही. आजही ते एकूरगा या गावात पत्र्याच्या घरात राहतात. आई-वडिलांनी पाहिलेले नागरी सेवेचे स्वप्न मुलाने अखेर पूर्ण केले.
पाच वेळा आले अपयश, सोडली नाही जिद्द
गेल्या सहा वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असित हे मागील एक वर्षापासून दिल्ली येथील आंबेडकरवादी मिशन येथे नागरी सेवेसाठी अभ्यास करीत होते. असित हे २०१३ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. तब्बल पाच वेळा त्यांना अपयश आले. परंतु, त्यांनी जिद्द सोडली नाही. सहाव्या प्रयत्नात त्यांना हे यश लाभले आहे. त्यात वनसेवा व नागरी सेवेच्या लेखी परिक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वेळा मुलाखतीत यश मिळाले नव्हते़ जिद्द न सोडता त्यांनी प्रयत्न केले अन् यावर्षी या दोन्ही परिक्षांत त्यांनी दैदिप्यमान यश मिळविले़ या यशानंतर त्यांच्यावर एकुरगा या गावी नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला़
न्यूनगंड बाळगू नका
याच वर्षी भारतीय वनसेवा स्पर्धा परीक्षेत निवड झाली होती़ आता नागरी सेवेतही निवड झाली आहे़ त्यामुळे मोठा आनंद झाला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून शिकलोय म्हणून यश मिळणार नाही, असा न्यूनगंड बाळगू नये. परीक्षा कठीण असल्या तरी अभ्यासात कठोर परिश्रम, एकाग्रता व चिकाटी महत्त्वाची आहे़ यश नक्की मिळते. या प्रवासात आई-वडीलांचे, बहिणीचे आणि आजी-आजोबांचे तर आशिर्वाद असतातच. पण त्यांच्याइतकेच माझ्या सर्व शिक्षकांचे माझ्या आयुष्यात योगदान आहे.
- असित कांबळे, आयएएस, ६५१ वी रँक