लोहारा तालुक्यातील उडीद, मूग धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:39 AM2021-09-08T04:39:19+5:302021-09-08T04:39:19+5:30
लोहारा शहरासह तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असून, गेल्या महिन्यात झालेल्या रिमझिम पावसावर सोयाबीन पिकांना जिवदान मिळाले. परंतु, मागील ...
लोहारा शहरासह तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असून, गेल्या महिन्यात झालेल्या रिमझिम पावसावर सोयाबीन पिकांना जिवदान मिळाले. परंतु, मागील तीन दिवसापासून लोहारासह तालुक्यातील कानेगाव, भातागळी, कास्ती, नागूर, मार्डी, हिप्परगा रवा, मोघा, खेड, माकणी, सास्तूर, अचलेर, आष्टा कासार, फणेपूर, वडगाव, माळेगाव, हराळी, करवंजी, हिप्परगा, विलासपूर पाढंरी, धानुरी, भोसगा, दस्तापूर आदी गावात सर्वदूर पाऊस झाला. त्यात आष्टा कासार, अचलेर परिसरात सर्वाधिक पाऊस झाला आहे. उडीद, मगाची काढणी आणि पाऊस एकदाच आल्याने तालुक्यातील १८२७ हेक्टरवरील मूग व ३४५९ हेक्टरवरील उडीदाचे पीक धोक्यात आले आहे. तावशीगड, आष्टाकासार, भोसगा, अचलेर शिवारात उडदाला कोंब फुटत असून, पाऊस कमी व वारा जास्त असल्याने भातागळी, जेवळी, पांढरी शिवारात ऊस देखील आडवा झाल्याचे चित्र आहे.
चौकट......
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण अत्यअल्प असल्याने तालुक्यातील नदी-नाल्यांना एकदाही पूर आला नाही किंवा तलाव पूर्ण क्षमतेने भरतील असे पाणी आले नाही. आता सोयाबीनच्या उत्पन्नातही घट होणार असून, हातातोंडाला आलेले उडीद, मूगही पाण्यात आहे.
- विजय लोमटे, शेतकरी, हिप्परगा (रवा)
नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या ऊसाची लागवड या भागात मोठ्या प्रमाणात झाली आहे. पावसाअभावी पाण्याची कमतरता असतानाही शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करीत ऊसाची फंडे जोमात आणली. परंतु शेतकऱ्यांच्या मागील एक संकट संपते ना संपते तोच दुसरे उभे राहत असल्याची प्रचिती पुन्हा आली.
- अमोल पाटील, शेतकरी,भातागळी
शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतो. त्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाकडून ॲपचा वापर करा, वेळेत तक्रारी नोंदवा, अशा सूचना केल्या जातात. परंतु, प्रत्यषात शेतकऱ्यांना हे शक्य नाही. शासनाने जागेवर नुकसानीचे पंचनामे करुन दिवाळीपूर्वी मदत द्यावी.
- शरण्णाप्पा कबाडे, शेतकरी, लोहारा
सध्या मूग व उडीद पिकाची काढणी सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी उडीद व मुगाचा विमा भरला आहे, अशा शेतकऱ्यांचे जर सततच्या पावसामुळे नुकसान झाले असेल तर त्यांनी ॲपवर किंवा विमा कंपनी कार्यालय तसेच कृषी विभागाकडे नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत तक्रार नोंदवावी.
- मिलिंद बिडबाग, तालुका कृषी अधिकारी, लोहारा