उडीद, मुगाच्या राशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:34 AM2021-08-23T04:34:41+5:302021-08-23T04:34:41+5:30

मुरूम : शहर व परिसरात मृग व रोहिणी नक्षत्रांच्या सुरुवातीला पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांनी उडीद, मुगाच्या राशींना सुरुवात ...

Urad, starting with the amount of Muga | उडीद, मुगाच्या राशी सुरू

उडीद, मुगाच्या राशी सुरू

googlenewsNext

मुरूम : शहर व परिसरात मृग व रोहिणी नक्षत्रांच्या सुरुवातीला पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांनी उडीद, मुगाच्या राशींना सुरुवात केली आहे. मात्र, एकरी केवळ एक ते दोनच क्विंटल उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. लागवड खर्चाचीही पदरमोड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मुरूम मंडळात एकूण ३५ हजार ५०० हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. यात सर्वाधिक १७ हजार ९४८ हेक्टरवर सोयाबीन, ६ हजार ९५० हेक्टरवर तूर, ४ हजार ८२० हेक्टरवर उडीद, एक हजार ६५० हेक्टरवर मूग, तर २ हजार ४५० हेक्टरांवर उसाची लागवड झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सुरुवातीला पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांनी उडीद, मुगाच्या राशींना सुरुवात केली असून, अनेक शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील उडीद, मूग, तूर, सोयाबीन पिकांना अतिवृष्टीने पाणी लागून पिके वाया गेली आहेत. पिके ऐन बहरात असताना पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला. यानंतरही शेतकऱ्यांनी औषध फवारणी करून कशीबशी पिके जगवली. सध्या मूग आणि उडदाच्या राशी सुरू आहेत. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्न निम्म्याने घटल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडली असून, अनेकांना लागवड खर्चही पदरात पडला नसल्याचे दिसून येत आहे.

चौकट.....

आमदनी आठन्नी

बाजारात सध्या उडदाला प्रतिक्विंटल सात हजार ५०० ते सात हजार ८०० रुपये, तर मुगाला सहा ते सात हजारांपर्यंत भाव मिळत आहे; तर राशी करण्यासाठी प्रतिएकर पाच ते सहा हजार रुपये लागवड खर्च येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शिवाय पेरणी खर्च आणि वर्षभर शेतात राबलेला खर्च वेगळा आहे. त्यामुळे परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची या वर्षी ‘आमदनी आठन्नी खर्चा रुपय्या’ अशी अवस्था असल्याचे चित्र आहे.

आशेवर पाणी

मळणी यंत्रवाले ७० किलोंच्या एका पोत्यासाठी ४०० रुपये घेत आहेत. शिवाय काढणीचा खर्च वेगळा आहे. शेतकऱ्यांना किमान एका एकरात चार ते पाच क्विंटल उडीद, मुगाचे उत्पन्न मिळण्याची आशा होती. मात्र, सध्या एका एकरात एक ते दोन क्विंटलच शेतमाल मिळत आहे. त्यामुळे निसर्गाने नेहमीप्रमाणे यंदाही आशेवर पाणीच फिरविले आहे.

Web Title: Urad, starting with the amount of Muga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.