बारावी निकाल : उस्मानाबादेत मुलीच अव्वल; मात्र निकालाचा टक्का घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 05:22 PM2019-05-28T17:22:47+5:302019-05-28T17:26:28+5:30
यावर्षी जिल्ह्याच्या निकाल ८२.७२ टक्के लागला
उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ८२.७२ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ०़९२ टक्क्यांनी निकालात घट झाली आहे़ यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९०.३८ टक्के आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील १५ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी केली होती. यामध्ये ८ हजार ७६० मुले तर ६ हजार ९८४ मुलींचा समावेश होता. प्रत्यक्ष परीक्षेला १५ हजार ६५९ परीक्षार्थी बसले असता, १२ हजार ९५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण ८२.७२ टक्के एवढे आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.९२ टक्क्यांनी निकालात घसरण झाली आहे. सर्वाधिक ८६.६२ टक्के निकाल उस्मानाबाद तालुक्याचा लागला आहे. तर भूमच्या निकालाचा आलेख घसरणीला लागला आहे. २०१८ च्या तुलनेत यंदा १.७९ टक्क्यांनी निकाल घटला आहे. जिल्हाभरातील १४२ पैकी सात कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला. तर परीक्षेला बसलेल्यापैकी एकही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ न शकलेल्या कॉलजची संख्या एक एवढी आहे. शाखानिहाय निकाल पाहता विज्ञान शाखेचे सर्वाधिक ८८.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.