उस्मानाबादेत आजारी असल्याचा बनाव करणारे १५ पोलीस कर्मचारी एकाच दिवशी निलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 06:18 PM2018-12-04T18:18:04+5:302018-12-04T18:21:46+5:30
एकाच दिवशी एक दोन नव्हे १५ कर्मचारी निलंबीत झाल्याने कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़
उस्मानाबाद : आजारी नसतानाही आजारी असल्याचा बनाव करणाऱ्या जिल्हा पोलीस दलातील १५ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक आऱ राजा यांनी आज निलंबीत केले. एकाच दिवशी एक दोन नव्हे १५ कर्मचारी निलंबीत झाल्याने कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़
उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाचा पदभार हाती घेतल्यापासून पोलीस अधीक्षक आऱ राजा यांनी अवैध दारू, जुगारांविरूध्द धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे़ कर्तव्यकसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे़ पोलीस अधीक्षकांच्या धडक कारवाई आणि निलंबन सत्रामुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांसह कामचुकार अधिकारी, कर्मचारी हैराण झाले आहेत़ आजारी रजेवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली होती़ यात १५ कर्मचारी आजारी नसताना आजारी असल्याचा बनाव करून आजारी रजा घेत कर्तव्यावर गैरहजर राहिल्याचे दिसून आले़ त्यामुळे पोलीस अधीक्षक आऱ राजा यांनी आज कार्यालयीन आदेश काढून एकाच दिवशी १५ कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे़
यात पोलीस मुख्यालयासह सात पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़ निलंबन कालावधीत काहींना पोलीस मुख्यालयाशी तर काहींना इतर पोलीस ठाण्याशी संलग्न करण्यात आले आहे़ बेशिस्त, निष्काळजीपणा, गैरवर्तणूक, शिस्तभंगाबाबतच्या प्रकरणाची चौकशी पोलीस अधीक्षकांनी सुरू केली आहे़ दरम्यान, एकाच दिवशी १५ पोलीस कर्मचारी निलंबीत होण्याची जिल्हा पोलीस दलातील ही पहिलीच घटना आहे़ पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे़