उस्मानाबादेत फिर वही दिल लाया हूँ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 08:06 IST2019-04-05T08:06:47+5:302019-04-05T08:06:52+5:30
भाऊबंदकीची लढत । पुन्हा वैयक्तिक टीकेवर भर; मतदारांच्या मुद्द्यांपासून प्रचार दूरच

उस्मानाबादेत फिर वही दिल लाया हूँ !
उस्मानाबाद मतदारसंघात पाटील-राजेनिंबाळकर घराण्यात चुरशीची लढत होत आहे. या कुटुंबातील पारंपरिक वैर प्रचारात प्रतिबिंबित होत असून, कार्यकर्ते अजूनही मतदारांच्या मुद्यांवर यायला तयार नाहीत. या दोघांत झालेल्या मागच्या दोन विधानसभा निवडणुका या वैयक्तिक संघर्षावरच झाल्या होत्या. आता लोकसभेला आमनेसामने आल्यानंतरही पुन्हा तेच घडू पाहतेय.
राष्ट्रवादीकडून माजी मंत्री आ. राणा जगजीतसिंह पाटील, तर शिवसेनेकडून ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे आमनेसामने आहेत. तसे नात्याने हे दोघे चुलतभाऊच. मात्र, मागच्या पिढीतून आलेल्या वैमनस्याचा वारसा अजूनही तितक्याच त्वेषाने त्यांच्याकडून जपला जात आहे़ डॉ़ पद्मसिंह पाटील व पवनसिंह राजेनिंबाळकर या सख्ख्या चुलत भावांत वितुष्ट आल्यानंतर हे दोघे २००४ च्या विधानसभेला पहिल्यांदा आमनेसामने आले होते. पुढे पवनराजेंची हत्या झाल्यानंतर या कुटुंबातील वैर पुढच्या पिढीने जपले. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत त्याची प्रचिती येत आहे.
एकाच दिवशी दोघांचीही उमेदवारी जाहीर झाली. त्या दिवसापासूनच त्यांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडले आहेत. असभ्य भाषेचा वापर करीत त्यांच्यात 'कार्टून स्ट्राईक' सुरू आहे. तप उलटले तरी निवडणूक प्रचाराचा प्रमुख मुद्दा तेरणा कारखाना अन जिल्हा बँकच राहिला आहे. तो कोणी व कसा बुडविला, यावर कार्टुनद्वारे भाष्य सुरू आहे. या चिखलफेकीचे शिंतोडे थेट उमेदवारांवरच उडताना दिसत आहेत. 'एकास दोन' या समीकरणानुसार एक बाजूने एक कार्टून प्रसृत झाले की दुसरीकडून उत्तरादाखल दोन कार्टून 'लॉन्च' होताहेत. या दोघांच्या लढाईत वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे. घराणेशाहीचा आरोप करीत वंचितांच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन त्यांच्याकडून प्रचारात केले जात आहे. उमेदवार अर्जुन सलगर प्रचारात व्यस्त असले तरी त्यांची बरीचशी भिस्त ही प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवैसी यांच्यावरच दिसून येते. सोबतच बसपानेही डॉ. शिवाजी ओमन यांना रिंगणात उतरविले आहे.
मित्रपक्षांच्या 'नेकीं'वर बरेचसे अवलंबून...
सेना-काँग्रेस अन् राष्ट्रवादी-भाजप, अशी आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांत पाहायला मिळाली़ मात्र, या अभद्र आघाड्या आता तोडायच्या असे ठरले आहे. जिल्ह्यात काँग्रेसची व भाजपची ताकद बेदखल करावी अशी निश्चितच नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवार मित्रपक्षाच्या मदतीवर बरेचसे विसंबून आहेत. आजवरचा अनुभव पाहता मित्रपक्षांची ही नेकी शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचे आव्हान उमेदवारांपुढे आहे.
वैयक्तिक टीका-टिपण्या हा आपला अजेंडा नाही़ आम्ही आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात जिल्ह्यात जी काही विकासकामे झाली आहेत त्यावर व भविष्यात जी विकासकामे आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून करु शकतो, रोजगार मिळवू शकतो, यावरच भर देत आहोत़
- राणा पाटील, राकॉ
दीर्घकाळ सत्तेत राहूनही जिल्ह्याचा विरोधकांनी विकास केला नाही़ ही बाब प्रकर्षाने मांडतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वसामान्यांसाठी असलेली धोरणे, राष्ट्राभिमान तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शेतकरी, सामान्यांप्रती असलेली ठाम भूमिका व त्यांच्या नजरेतील विकास घेऊन मतदारांसमोर जात आहोत़
- ओम राजेनिंबाळकर, सेना
प्रमुख उमेदवार
राणा पाटील । राकॉ
ओम राजेनिंबाळकर । सेना
अर्जुन सलगर। वंचित आघाडी
कळीचे मुद्दे
उस्मानाबाद मतदारसंघात एकही मोठा प्रकल्प नाही़ रोजगारासाठी तरुणांना पुणे-मुंबईची वाट धरावी लागते़
शेतकरी आत्महत्येत जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे़ त्यांच्यासाठी ठोस उपाय योजना अंमलात आणली जात नाही़