आंदोलनकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; वेळीच पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 06:34 PM2022-10-02T18:34:47+5:302022-10-02T18:45:57+5:30
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडीपल्ली यांच्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून त्यांचा प्रशासकीय पदाचा कार्यभार काढून घ्यावा, या मागणीसाठी शहरातील काँग्रेस, भाजपा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्महदनाचा प्रयत्न केला.
परंडा (उस्मानाबाद): नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडीपल्ली यांच्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून त्यांचा प्रशासकीय पदाचा कार्यभार काढून घेण्याची मागणी शहरातील काँग्रेस, भाजपा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. मागणीची दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र ठराविक वेळेत आयुक्तांनी कारवाई न केल्याने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आंदोलनकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टाळला.
आंदोलनकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; वेळीच पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला... pic.twitter.com/tjdrZCaLed
— Lokmat (@lokmat) October 2, 2022
काँग्रेस, भाजपा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी २१ सप्टेंबर रोजी येथील विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडीपल्ली यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. मुख्याधिकारी मनीषा वडीपल्ली यांच्या कार्यकाळाचे लेखा परीक्षण करण्यात यावे, भंगाराची बेकायदेशीर रित्या विक्री केल्याप्रकरणी चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, घनकचरा व्यवस्थापनातील बिले व त्यात असणाऱ्या मास्टर पावत्या इत्यादी घोटाळ्याची चौकशी व्हावी, ई-निविदामध्ये झालेल्या बेकायदेशीर काम वाटपाची तात्काळ चौकशी व्हावी, यासोबतच मुख्याधिकारी ह्या एका राजकीय पक्षास फायदा पोहोचविण्याच्या उद्देशाने काम करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. आठ दिवसांच्या आत मुख्याधिकारी वडीपल्ले यांच्याकडील प्रशासनाचा कारभार तात्काळ काढून भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती.
मागणीचा विचार न झाल्यास महात्मा गांधी जयंती दिवशी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसात प्रशासनाकडून कसलीच कारवाई न झाल्याने रविवारी तहसील कार्यालयासमोर एका चार चाकी वाहनातून अचानक आंदोलकर्ते उतरले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी अचानक त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस व आंदोलनकर्त्यांत मोठी झटापट देखील झाली. पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी काँग्रेसचे नेते अँड नुरद्दीन चौधरी, शिवसेना शहर प्रमुख इरफान शेख, शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरेशी, बाशाभाई शहाबर्फीवाले, एम आय एम तालुकाप्रमुख जमील पठाण, समीर पठाण, अजहर शेख, सत्तार पठाण, जावेद पठाण यांना ताब्यात घेतले.