उस्मानाबादची बंदीशाळा बनली विषमुक्त शेतीची प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 03:53 PM2018-02-10T15:53:45+5:302018-02-10T19:43:33+5:30

पेराल तेच उगवेल, हे खरेच ! अनाहूतपणे विषारी विचार पेरलेल्या मनातून झालेली गुन्ह्याची उत्पत्ती माणसाला अंधारकोठडीत पोहोचविते़ पण, या कोठडीतील अंधार दूर सारुन कैद्यांच्या मनात विधायकतेचा प्रकाश आणण्याचे कार्य उस्मानाबादच्या कारागृहात सुरु आहे़ गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या मनात सेंद्रीय शेतीची पेरणी करुन कारागृह प्रशासन विषमुक्त अन्नधान्य अन् समाज उगवू पाहत आहे़

Usmanabad's open jail becames a laboratory of organic farming | उस्मानाबादची बंदीशाळा बनली विषमुक्त शेतीची प्रयोगशाळा

उस्मानाबादची बंदीशाळा बनली विषमुक्त शेतीची प्रयोगशाळा

googlenewsNext
ठळक मुद्देउस्मानाबाद जिल्हा कारागृहाकडे एकूण १७ एकर ३० गुंठे जमीन आहे़ त्यापैकी ९ एकर १३ गुंठे जमीन शेतीसाठी वापरात आणली गेली आहे़या शेतीतून प्रामुख्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे़ त्यासाठी कुठल्याही रासायनिक खत, औषधीचा वापर केला जात नाही़सध्या येथील शेतीत पत्ताकोबी, बटाटे, टोमॅटो, वांगी, भोपळा, मुळा, डांगर, शेवगा, ज्वारी, मका आदी पिकांची लावण करण्यात आली आहे़

- चेतन धनुरे

उस्मानाबाद : पेराल तेच उगवेल, हे खरेच ! अनाहूतपणे विषारी विचार पेरलेल्या मनातून झालेली गुन्ह्याची उत्पत्ती माणसाला अंधारकोठडीत पोहोचविते़ पण, या कोठडीतील अंधार दूर सारुन कैद्यांच्या मनात विधायकतेचा प्रकाश आणण्याचे कार्य उस्मानाबादच्या कारागृहात सुरु आहे़ गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या मनात सेंद्रीय शेतीची पेरणी करुन कारागृह प्रशासन विषमुक्त अन्नधान्य अन् समाज उगवू पाहत आहे़

उस्मानाबाद जिल्हा कारागृहाकडे एकूण १७ एकर ३० गुंठे जमीन आहे़ त्यापैकी ९ एकर १३ गुंठे जमीन शेतीसाठी वापरात आणली गेली आहे़ भरमसाठ रासायनिक खते, औषधी वापरलेल्या अन्नधान्य-भाजीपाल्यातून मानवी शरिरात निर्माण होणार्‍या व्याधी लक्षात घेत कारागृह अधीक्षक एस़सी़ भगुरे यांच्या संकल्पनेतून येथील शेती सेंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला़ यासाठी एका कृषी सहायकाची नियुक्तीही याठिकाणी करण्यात आलेली आहे़ कारागृह परिसरात शेतीसाठी घेण्यात आलेल्या विहीर व बोअरला मुबलक पाणी उपलब्ध असते़ त्यामुळे संपूर्ण शेती बारमाही पाण्याखाली आहे़ या शेतीतून प्रामुख्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे़ त्यासाठी कुठल्याही रासायनिक खत, औषधीचा वापर केला जात नाही़ सेंद्रीय खत, औषधींचा वापर करुन पिके वाढविली जात आहेत़

सध्या येथील शेतीत पत्ताकोबी, बटाटे, टोमॅटो, वांगी, भोपळा, मुळा, डांगर, शेवगा, ज्वारी, मका आदी पिकांची लावण करण्यात आली आहे़ या सेंद्रीय शेतीतून उत्पादित होणारा भाजीपाला कारागृहातील कैद्यांसाठीच वापरला जातो़ जर उत्पादन जास्त झाले तर हा भाजीपाला शेजारच्या सोलापूर, लातूर येथील कारागृहांना पुरविला जात आहे़ उस्मानाबादच्या कारागृहात सरासरी दोनशे ते सव्वादोनशे कच्चे व शिक्षा झालेले कैदी असतात़ त्यांना विषमुक्त शेतीतून तयार झालेला पोषक आहार सध्या मिळायला लागला आहे़ शिक्षा झालेल्या कैद्यांनाच शेतीकाम दिले जाते़ त्यामुळे त्यांना सेंद्रीय शेतीचे धडेही येथून गिरवायला मिळत आहेत़ म्हणूनच उस्मानाबादची ही बंदीशाळा जणू कैद्यांसाठी विषमुक्त शेतीची प्रयोगशाळा बनली आहे़


कैदी रमले शेतीत़़

वेगवेगळ्या गुन्ह्यात बंदीवास भोगत असलेल्या कारागृहातील दोन कैद्यांकडे घरची शेती आहे़ हे दोघेही कारागृहातील सेंद्रीय शेतीत चांगलेच रमले आहेत़ बंदीवासातून बाहेर पडल्यानंतर आपण घरची शेतीही अशाच पद्धतीने विकसित करुन सन्मानाचे जीवन व्यतीत करणार असल्याचे ते म्हणाले़


सेंद्रीय खताची निर्मिती़

कारागृह प्रशासनाकडे शेती कसण्यासाठी दोन बैल, एक ट्रॅक्टर आहे़ बैलांचे शेण तसेच कैद्यांकडून राहिलेल्या अन्नाचा वापर करुन सेंद्रीय खताची निर्मिती कारागृह परिसरातच करण्यात येत आहे़ हे खत पुरेसे ठरते़ फवारणीसाठी सेंद्रीय औषधी मात्र विकत आणावी लागते, अशी माहिती वरिष्ठ तुरुंगाधिकारी डी़एस़ इगवे यांनी सांगितले़

सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्ऩ़़

कारागृहातील कैद्यांच्या मनपरिवर्तनासाठी नियमित वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात़ बंदीवासातून बाहेर पडल्यानंतर सन्मानाचे जीवन त्यांना जगता यावे, यासाठी सेंद्रीय शेती, दुग्धव्यवसाय, उद्योजकतेचे धडेही देण्यात येत आहेत़ 
- एस.सी. भगुरे, कारागृह अधीक्षक

Web Title: Usmanabad's open jail becames a laboratory of organic farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.